उद्योजिका बिझनेस एक्स्पोचे शानदार उद्घाटन ; प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद

 
 कोल्हापूर: जिल्ह्यातील महिलांच्या कला-गुणांना वाव मिळावा, त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशानं कोल्हापुरात उद्योजिका बिझनेस एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय. भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर आणि मुक्ता मंच यांच्या पुढाकारातून आजपासून हॉटेल पॅव्हलियन इथं या एक्स्पोला उत्साहात सुरवात झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन झालं.  आज पहिल्या दिवशी आयोजित विविध स्पर्धांंना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बचत गटांचे स्टॉल आणि खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलवरही महिलांनी मोठी गर्दी केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन केलं जातं. या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, तसंच महिलांच्या कला-गुणांना वाव मिळावा, या उद्देशानं कोल्हापुरात आजपासून उद्योजिका बिझनेस एक्स्पोला सुरवात झाली.  हॉटेल पॅव्हेलियन इथं या एक्स्पोचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, सौ. अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन संचलित रोटरी लोक कल्याण मंडळाकडून पिरवाडी गावच्या मंदा कदम या दिव्यांग महिलेला जयपूर फूट प्रदान करण्यात आला. सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते हा उपक्रम झाला.  या प्रसंगी रोटरी मिडटाऊचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, श्रीकांत जोशी, सुहास कुरणे उपस्थित होते. या बिझनेस एक्स्पो मध्ये महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स लावले आहेत. तसंच विविध कंझ्युमर्स स्टॉल्सद्वारे जीवनावश्यक वस्तू, गृहसजावटीच्या वस्तू, कपडे उपलब्ध आहेत. जीभेचे चोचले पुरवणारे खाद्य पदार्थांचेही स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. महोत्सवादरम्यान आज दुपारच्या सत्रात अंब्रेला पेंटिंग स्पर्धा आणि मॉम अँड कीड कॉम्पिटिशन घेण्यात आली. या दोन्ही स्पधार्ंना महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान झालेल्या कराओके ट्रॅकवरील गायन स्पर्धेतही महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. तसंच कचरा व्यवस्थापन मार्गदर्शन या विषयावर अनुराधा सामंत आणि देवदत्त नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमासाठी जी. एस. चहा हे प्रायोजक म्हणून लाभले आहेत. तर माध्यम प्रायोजक म्हणून चॅनल बी आणि रेडिओ सिटी काम पाहत आहेत. या एक्स्पो दरम्यान मिस कॉल द्या आणि बक्षिसं जिंका, या योजनेअंतर्गत आज भाग्यवान ग्राहकांना बक्षिसं देण्यात आली.  या योजनेसाठी बालाजी कलेक्शन, अग्रवाल गोल्ड आणि हॉटेल अमृत हे प्रायोजक होते. याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शर्मिष्ठा चौगुले, मुक्ता मंचच्या अध्यक्षा सुवर्णा गांधी उपस्थित होत्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!