कोल्हापूर: जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेने विविध कार्यक्रम योजना प्रकल्प आत्तापर्यंत यशस्वीरीत्या राबवले गेले. याचाच भाग म्हणून कोल्हापुरातील प्रेक्षणीय धार्मिक व सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी आडवाटेवरचे कोल्हापूर असा उपक्रम सुरू करण्यात आला. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता श्रावण मासाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यातील प्राचीन देवांचे दर्शन घेण्यासाठी एक दिवसीय अध्यात्मिक सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे.५० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ही सहल मोफत असून अंबाबाई, दत्तगुरु, शंकर, मारुती, गणपती, विठ्ठल अशा पवित्र देवतांचे दर्शन व भक्तीची संधी उपलब्ध होणार आहे अशी माहिती हिल रायडर्स फाऊंडेशनचे प्रमुख प्रमोद पाटील व संवेदना सोशल फाउंडेशनचे राहुल चिकोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना असतो भक्ती स्वरूपाने निसर्गात जाण्याचा हा कालावधी आहे. हिरवाईने नटलेल्या निसर्गात पंचक्रोशीतील देवालयांची यात्रा करणं ही आपली संस्कृती आहे. म्हणून घरातील आजी-आजोबांसाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मनातून दर्शनाची ओढ आहे पण एकट्याने जाणे शक्य नाही ही बाब लक्षात घेऊन अनुभवी संस्था व कार्यकर्त्यांच्या मार्फत या एकदिवसीय सहलीचे आयोजन केले आहे. ही सहल प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी निघणार आहे. यामध्ये आंबा बाई मंदिर, मनपाडळे येथील मारुती मंदिर, शिरोळ येथील गणेश मंदिर, वाडीचे दत्त मंदिर खिद्रापूरचे महादेव मंदिर अशा ठिकाणी भेट देणार आहे. यासोबत सहलीत निसर्गासोबतच वास्तुकलेचा आनंद, भजन, सामूहिक फराळ आणि भक्तीचा अनुभव घेता येणार आहे. नीट नेटके नियोजन हे हिल रायडर्स फाऊंडेशनचे वैशिष्ट्य आहे. याला संवेदना सोशल फाउंडेशनने सहकार्य केले आहे. सहलीदरम्यान उपवासाचे पदार्थ फळे इत्यादी सुविधा असून मोठ्या बसद्वारे ही सहल संपन्न होईल. इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी समिट एडवेंचर्स, हॉटेल पर्ल शेजारी, न्यू शाहूपुरी येथे संपर्क साधावा असे आवहन फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply