रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर आणि भागिरथी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या १२ आणि १३ ऑगस्ट या दोन दिवसीय बिझनेस एक्स्पोमध्ये दुसर्या दिवशी महिलांना यशस्वी उद्योजकांचा प्रवास अनुभवण्याची संधी मिळाली. तसेच सायंकाळी झालेल्या एकाहून एक बहारदार समूह नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
हॉटेल पॅव्हेलियन मध्ये १२ आणि १३ ऑगस्टला उद्योजिका बिझनेस एक्स्पो पार पडला. पहिल्या दिवशीप्रमाणेच दुसर्या दिवशी म्हणजे १३ ऑगस्टला या एक्स्पोला महिलांनी मोठी गर्दी केली होती. या एक्स्पोमध्ये लावलेल्या स्टॉल्सवर खरेदी करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र या एक्स्पो मध्ये खरा रंग भरला तो यशस्वी उद्योजकांच्या मार्गदर्शनामुळे अकलुजच्या उद्योजिका सविता व्होरा यांनी सावित्रीबाईं फुलेंची प्रेरणा घेऊन महिलांनी कार्यरत राहावे, असे सांगितले. महिला व्यवसायाशी प्रामाणिक राहतात. हीच तत्व आयुष्याला कलाटणी देऊन यशस्वी बनवतात, असे व्होरा यांनी स्पष्ट केले. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा महिलांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावे, असे सांगून बाजारपेठेचं तंत्र आणि मंत्र याबाबतची माहिती दिली. त्याचप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंट गुरु कृष्णा पाटील यांनी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता, कल्पकता, अभ्यासूवृत्ती याविषयीची माहिती दिली. चित्रफितीद्वारे व्यवसायाचं तंत्र, अनेक क्षेत्रात उपलब्ध असणार्या संधी, शासकीय योजना, सेवा याविषयीची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली. या दोन्ही व्याख्यानामुळे यशस्वी उद्योगांचा मुलमंत्र उपस्थित महिलांना मिळाला. त्यानंतर या एक्स्पो मध्ये रंग भरला तो बहारदार समुह नृत्यांनी ! समूह नृत्य स्पर्धेला जिल्हयातील महिलांच्या संघांचा दंड प्रतिसाद लाभला. कोल्हापुरातील समूह नृत्य स्पर्धेत २५ पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते. उज्ज्वल डान्स ऍकॅडमीनं देवा श्री गणेशा.. या नृत्याचं सादरीकरण केलं. नृसिंह ग्रुप संघानं, चल सर्जा, चल राजा…हे शेतकरी गीत सादर केलं. तर अनुप अँड प्रणव ग्रुप तसंच डीआयडी ग्रुपच्या कलाकारांनी पाश्चात्य नृत्य सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. भारतमाता आणि देशप्रेमावर आधारित नृत्य दि डायनामिक स्टुडिओनं सादर केलं. आंबे ग्रुप ऑफ शिवानी, स्टेप इन राइस ऍकॅडमी यांच्या कलाकारांनीही उत्तम कलाविष्कार सादर केला. समूह नृत्य स्पर्धेत भोसले सिस्टर्सनं प्रथम, व्ही. एस. ग्रुपनं द्वितीय आणि डेंजरस ग्रुपनं तिसरा क्रमांक पटकावला. एकूणच उद्योजिका एक्स्पोचा दुसरा दिवसही उत्तम मार्गदर्शन आणि बहारदार नृत्यांनी गाजला. याप्रसंगी संयोजिका सौ. अरूंधती महाडिक, सुवर्णा गांधी, शर्मिला चौगुले, निशिकांत सरनाईक, मंगलताई महाडिक, ग्रीष्मा महाडिक, सोनाली महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply