
कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त *सलग सहाव्या वर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच दि. २७ ऑगस्ट २०१८ रोजी “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. याबाबत आज शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे समस्त हिंदू धर्म संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हिंदू धर्म संघटनाकरीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी, हिंदू धर्मातील सणांची महती सर्वाना व्हावी, हिंदू धर्माचे प्रसारण व्हावे, याकरिता पाच वर्षांपूर्वी समस्त हिंदू धर्म संघटनाच्या वतीने श्रावण व्रत- वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाची सुरवात झाली. हिंदू धर्म प्रगतीचे काम व्हावे, हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे या हेतूने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली असून, या उपक्रमास शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचे अनुकरण कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावातही होऊ लागल्याने या उपक्रमाची सुरवात आपण केली याचा आनंद होत आहे. या उपक्रमाचे स्वरूप या पेक्षाही मोठे होऊन संपूर्ण राज्यभरात श्रावण व्रत वैकल्य उपक्रम व्हावा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यानंतर या श्रावण व्रत वैकल्य कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये त्या दिवशीचे कार्यक्रम, यज्ञ, ध्वज वंदन, गोमाता पूजन, पत्रिका व पासेस वाटप आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये समस्त हिंदू हिंदू धर्मातील सणांवर प्रशासनाच्या होणाऱ्या दडपशाही विरोधातही चर्चा करण्यात आली. पुढील महिन्यात येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव काळात प्रशासनाकडून गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांना मंडप, ध्वनीक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा, वेळेचे बंधन आदी बाबतीत होणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही या बैठकीत हिंदू धर्म संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. यासह येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गोमाता हत्येबाबत कडक पाऊले उचलावीत, अन्यथा हिंदुत्ववादी संघटना रस्तावर उतरतील असा इशाराही याबैठकीत देण्यात आला. यासह मे. न्यायालयाचा आदेश असतानाही इतर धर्मियांच्या धर्मस्थळावर असणाऱ्या ध्वनीक्षेपाकावर कोणतीही कारवाई होत नसताना, हिंदू सणांना वाजणाऱ्या साउंड सिस्टमला विरोध का? असा सवालही उपस्थित करीत, सर्वांना समान न्यायाची भूमिका प्रशासनाने ठेवावी, अन्यथा हिंदू धर्मियांच्या सणांवर लादण्यात येणारे निर्बंध आणि होणारी प्रशासनाची दडपशाही समस्त हिंदू धर्म संघटना खपवून घेणार नाहीत, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.
या बैठकीस विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पोतनीस, शहर अध्यक्ष अशोक रामचंदानी, गोरक्षाप्रमुख तुकाराम मांडवकर, शहरसह मंत्री सुधीर जोशी वंदूरकर, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले, आण्णा पोतदार, गजानन तोडकर, महादेव रामचंद्र यादव, हिंदू महासभेचे मनोज सोरप, हिंदू जनजागृतीचे मधुकर नाझरे, सुधाकर सुतार, शरद माळी, हिंदू महासभेचे नंदू घोरपडे, शिवप्रतिष्ठानचे सुरेश यादव, शिवसेनेचे किशोर घाटगे, रघुनाथ टिपुगडे, कमलाकर किलकिले, संभाजीराव भोकरे, राजू यादव आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply