
पुणे : कोल्हापूर आणि पुणे या दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेची बचत व्हावी यासाठी शताब्दी एक्सप्रेसच्या धर्तीवर कोल्हापूर-पुणे रेल्वे सुरू करण्याची मागणी पुण्यात मध्य रेल्वेसाठी संसद सदस्यांबरोबर झालेल्या विभागीय बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निवेदनाद्वारे केली. तसेच पुणे ते मिरज ही डबल लाईन (दुहेरी रेल्वे मार्ग) लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, त्याच बरोबर कोल्हापुरातील रेल्वेबाबत काही ठोस मागण्याही केल्या. यात वैभववाडी-कोल्हापूर या नव्या रेल्वे लाईन प्रकल्पांतर्गत वळीवडे हॉल्ट स्टेशनचा दर्जा ‘ब’ वर्ग स्थानक करावा,तसेच पुणे-मिरज विभागात प्रस्तावित ‘ब’ वर्ग वळीवडे रेल्वे स्थानकाच्या इएसपीत कोल्हापूरसाठी सॅटेलाईट रेल्वे स्थानक म्हणून तरतुदीचा समावेश करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे परदेशी असल्यामुळे ते सदरच्या बैठकीस उपस्थित राहू शकणार नव्हते म्हणून त्यांनी त्यांचे दिल्लीचे सचिव योगेश केदार यांना निवेदन घेऊन बैठकीस पाठविले होते.
त्यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोल्हापूर भागातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी कराड-कोल्हापूर-बेळगावी अशी नवी रेल्वे लाईन सुरू करण्यात यावी, तसे झाल्यास या भागातील शेतमाल आणि औद्योगिक मालाच्या वाहतुकीला मोठी चालना मिळेल, त्याचबरोबर हा मार्ग नंतरच्या कोकणातील वैभववाडी विभागाला जोडण्यात यावा, जेणेकरून तेथील खाण मालाच्या बाहतुकीला मदत होईल. सोलापूर-तुळजापूर -उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळावी. या मार्गामुळे या भागातील लोकांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि पुणे, मुंबई तसेच कर्नाटक आणि तेलंगणातील महत्वाच्या शहरांना ते जोडले जातील . तसेच तुळजापूर येथे रेल्वे आरक्षण केंद्राचे कामही वेगाने व्हावे अशी अपेक्षा त्यांनी या निवेदनात केली आहे. कोल्हापूरहून आठवड्यातून तीनदा मिरज, उस्मानाबाद,लातूर आणी उदगीरमार्गे बिदरला जाणा-या रेल्वेच्या फे–या वाढवाव्यात, अशी मागणीत्यांनी निवेदनात केली आहे.
कोल्हापूरमधील रेल्वे सुविधेबाबात खा.संभाजीराजे छत्रपती वेळोवेळी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी संपर्क साधून आपल्या मागण्यांबाबत चर्चा करत असतात.
या बैठकीस पश्चिम महाराष्ट्रातील खासदारांसोबत मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री.डी.के.शर्मा तसेच खा.संभाजीराजे छत्रपती यांचे दिल्लीचे सचिव योगेश केदार आदीउपस्थित होते.
Leave a Reply