गणेशोत्सवात प्रत्यक्ष भेटणार अगडबम ‘नाजुका’

 

विघ्नहर्त्याचा आशीर्वाद लाभला की, पुढचा मार्ग सहजसोपा होतो असे म्हणतात. त्यामुळे अनेकजण आपल्या कामाची सुरुवात गणपती उत्सवापासून करणे पसंत करतात. आपल्या सर्वांच्या लाडक्या नाजुकानेदेखील आपल्या आगामी सिनेमाची दमदार सुरुवात या दिवसांपासून केली आहे. पेन इंडिया लिमिटेड कंपनीचे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’  चित्रपटातील नाजुका आपल्या अगडबम रुपात, प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटण्यास त्यांच्या शहरात येणार आहे. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये ती महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेश मंदिरे आणि सार्वजनिक मंडळांना भेट देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या या गणरायाचा आशीर्वाद घेण्याबरोबरच,तिथल्या प्रेक्षकांसोबत ती संवाददेखील साधणार आहे. इतकेच नव्हे तरमहराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘माझा अगडबम’ सिनेमातील या नाजुकाच्या ३५ फूट उंच कटआऊटचे यादरम्यान उद्घाटन केले जाणार आहे. प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणाऱ्या या भव्यदिव्य कटआऊटमुळे, ठिकठिकाणी उत्साहात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाला चांगलाच रंग चढणार आहे.

      राज्यभरातील विविध सार्वजनिक मंडळांमध्ये स्थानापन्न झालेल्या भव्य गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या स्थानिकांना अगडबम रूपातली नाजुकादेखील तिथे भेटणार असल्या कारणामुळे, यंदाच्या उत्सवाला जत्रेचे स्वरूप लाभणार आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरने साकारलेली ‘नाजुका’  या व्यक्तिरेखेने यापूर्वीदेखील ‘अगडबम’सिनेमाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे येत्या २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या ‘माझा अगडबम’ या सिक्वेलमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ती पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन तृप्तीनेच केली असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या या अगडबम नाजुकाला,आपल्या शहरात प्रत्यक्ष भेटण्यासाठी प्रेक्षकदेखील नक्कीच उत्सुक असतील हे निश्चित!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!