
कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं दरवर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या वर्षी बुधवार, ३ ऑक्टोबर रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं झिम्मा – फुगडी स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. तसंच स्पर्धेमध्ये युवतींचा सहभाग वाढावा याकरता १५ ते २० वयोगटातील युवतींसाठी ५० हजार रुपये बक्षिसाची वेगळी सांघिक झिम्मा स्पर्धा घेतली जाणार आहे, अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
भागीरथी महिला संस्था, गेल्या ९ वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करते. स्पर्धेला प्रत्येक वर्षी महिला भगिनींचा प्रतिसाद वाढत आहे. गेल्या वर्षी सुमारे १२ हजार महिलांनी झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचविणे, काटवट काणा, छुई फुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडा घोडा, पारंपारिक वेशभूषा अशा गटांमध्ये ही स्पर्धा होत असून, यंदा १५ हजारांहून अधिक महिला -युवती या स्पर्धेत सहभाग घेतील, अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, दुसर्या क्रमांकासाठी २० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तिसर्या क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी ५ हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह तसंच ५०१ रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. तसंच १५ ते २० वयोगटातील मुलींसाठी खास ५० हजार रुपये बक्षिसांचा वेगळा सांघिक झिम्माही आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं, असा भागीरथी महिला संस्थेचा प्रयत्न असल्याचं सौ. महाडिक यांनी सांगितलं. गेल्या ९ वर्षांत युवती आणि महिलांसाठी कळी उमलताना… हा प्रबोधनात्मक उपक्रम, मोफत शेळी वाटप, मोफत आरोग्य शिबिर, मोफत हेल्मेट वाटप, वृक्षारोपण, महिलांसाठी रोजगारपूरक मोफत प्रशिक्षण, बचत गटांना मोफत स्टॉल, मिस आणि मिसेस भागिरथी स्पर्धा, युवतींसाठी मोफत स्वसंरक्षण शिबिर, रक्तदान शिबिर, वाचनाची सवय वाढीला लागावी, यासाठी गावोगावी वाचनालय सुरू करणे असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांत झिम्मा-फुगडीच्या निमित्तानं अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये २०१५ साली युवती मंचच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. २०१६ साली भागीरथी महिला संस्थेच्या वेबसाईटचं उद्घाटन आणि पाऊलखुणा लोकसंस्कृतीच्या या पुस्तकाचं प्रकाशन आणि २०१७ साली कोल्हापूर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी भागीरथी संस्थेकडून मोठ्या संख्येनं कापडी पिशव्यांचं वाटप आणि भागीरथी संस्थेचे थीम सॉंग लॉंच करण्यात आलं. ही परंपरा दरवर्षी कायम राहणार असल्याचं सौ. महाडिक यांनी सांगितलं यावर्षी स्पर्धेचे फॉर्म भरण्याची सोय तालुकानिहाय प्रतिनिधींकडं आणि भागीरथीच्या कैलाश टॉवरवरील कार्यालयात उपलब्ध आहे. मंगळवार, २५ सप्टेंबर ही फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. जीएस चहा हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत आणि रेडिओ सिटी हे स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहेत. या स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा, यासाठी चॅनल बी च्यावतीने संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, असे सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शाहीर राजू राऊत, प्रा. आनंद गिरी, सुखदा कुलकर्णी, अनंत यादव उपस्थित होते.
Leave a Reply