‘फिल्मफेअर २०१८’ मध्ये ‘रिगण’ने पटकावले पाच पारितोषिक 

 

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारास पात्र अश्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती करणाऱ्या विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सच्या शिरपेचात, आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण, यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात लॅन्डमार्कच्या ‘रिंगण’ या सिनेमाने तब्बल पाच सर्वोत्कृष्ट पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा क्रिटीक्स अवाॅर्ड शशांक शेंडे यांना देण्यात आला असून, साहील जोशीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा आणि दिग्दर्शकीय पदार्पणासाठी व कथेसाठी मकरंद माने यांना गौरविण्यात आले. तसेच आदर्श शिंदेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी सन्मानित करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यातील अंतिम नामांकन यादीत लॅन्डमार्क फ़ील्म्सला एकूण १६ नामांकने प्राप्त झाली होती. ज्यात ‘गच्ची’ या सिनेमाच्या २ नामांकनाचादेखील समावेश आहे. ‘गच्ची’ सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रिया बापटला आणि सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणसाठी मनोज मोचेमाडकर यांना नामांकन प्राप्त झाले होते. रिंगण’ सिनेमाला १४ नामांकने जाहीर झाली होती. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी कल्याणी मुळे, सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी दासू वैद्य आणि वैभव देशमुख, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी अजय गोगावले, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारासाठी अभिजित अब्दे, सर्वोत्कृष्ट संवादासाठी मकरंद माने, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी गांधार आणि सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणसाठी महावीर सब्बनवर यांचा समावेश होता.अश्याप्रकारे, विविध पुरस्कार सोहळ्यात दर्जेदार कामगिरी करणाऱ्या लॅन्डमार्क फिल्मच्या चित्रपटांची मालिका अशीच पुढे कायम राहणार आहे. लॅन्डमार्क संस्थेअंतर्गत सादर होणाऱ्या या आशयसमृध्द चित्रपटांच्या यादीत आता ‘नशीबवान’ हा सिनेमादेखील नव्याने दाखल झाला आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामध्ये भाऊ कदमची प्रमुख भूमिका असणार आहे. उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली कि दिवार’ कथेवर आधारित असलेला हा चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!