
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या आशिया-युरोप संसदीय सहयोगी बैठकीत राज्यसभेचे खासदार संभाजीराजेछत्रपतींना पोलंडच्या शिष्टमंडळाने सुखद आश्चर्याचा धक्का दिला.
या बैठकीला पोलंडचे शिष्टमंडळही उपस्थित होते आणि त्यात पोलंडच्या सिनेटचे उपसभापती बॉग्डॅन बोरूसेविक्झी यांचा समावेश होता. त्यांनी खासदारसंभाजीराजे यांना “महाराज’ असे संबोधले,तेव्हा एका युरोपियन देशात दुस-या युरोपियन देशातील व्यक्ती आपल्याला महाराज म्हणून संबोधते याचे खासदारसंभाजीराजे यांना पराकोटीचे आश्चर्य वाटलेत्याचा त्यांना धक्काच बसला. बोरूसेविक्झी पुढे म्हणाले, “आपल्या राजघराण्याने आमच्या लोकांवर आलेल्या संकटकाळात जी माणुसकी, औदार्य आणि सहानुभूती दाखवली, त्याबद्दल माझा देश आणि देशातील लोक आपल्या राजघराण्याचा अत्यंत आदर करतो. ‘त्यानंतर त्यांनी दुस-या महायुद्धात सोविएत युनियनच्या ताब्यात असलेल्या पोलंडच्या कैद्यांवर जी वेळ आली होती, त्याबद्दल सांगितले.
दुस-या महायुद्धात पोलंडची मोठी वाताहत झाली. पोलंडच्या हजारो नागरिकांना पकडण्यात आले, छळछावण्यांत ठेवण्यात आले. त्यातील अनेक जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यात अनेक महिला आणि लहान मुले होती. ब्रिटीशांचा त्यांच्यावर रोष होता, आणि ब्रिटीशांचे साम्राज्य जगभर पसरलेले होते. साहजिकच पोलंडच्या या निर्वासितांना आश्रय द्यायला कुणी तयार नव्हते. पण करवीर संस्थानिकांनी ब्रिटीश सरकारचा रोष पत्करून पोलंडच्या या निर्वासितांना आश्रय देण्याचा निर्णय घेतला.
कोणतेही आढेवढे न घेता कोल्हापूरच्या राजघराण्याने या निर्वासितांना तत्काळ मदत पुरवली. त्यांनी वळीवडे येथे ताबडतोब कुटुंब छावण्या तयार केल्या. या ठिकाणी सुमारे १० हजार लोकांच्या,विशेषत: महिला आणि मुलांच्या, राहण्याची व्यवस्था केली. कोल्हापूरच्या महाराजांनी त्यांच्यासाठी दोन खोल्यांची घरे बांधून दिली, त्यात स्वयंपाकघर, स्नानगृह आणि व्हरांडा होता. एक बाजारपेठही त्यांना पुरवण्यात आली, जेणेकरून त्यांच्या गरजेच्या वस्तू त्यांना सहजपणे मिळाव्यात. ही छावणी लवकरच एक चांगली वसाहत म्हणून नावारूपाला आली. कोल्हापूरच्या महाराजांच्या सहकार्याने पोलंडच्या निर्वासितांनी तेथे बागा फुलवल्या, रस्त्यांना पोलिश नावे दिली, शाळा, दवाखाना आणि एक चर्चही इथे उभे राहिले. किराणा मालाची दुकाने, मासे, मटण बाजार, कापड दुकाने, स्टेशनरीची दुकाने इथे उघडण्यात आली इतकेच नाही तर दिवसातून एकदा सिनेमा दाखवणारे एक थिएटरही इथे होते. १९४३तें १९४७ या काळात या छावणीत १० हजार पोलिश लोक गुण्यागोविंदाने राहत होते. त्यांना इथे आर्थिक स्थैर्यही मिळाले. या छावणीला अनेक महान लोकांनी भेट दिली. त्यातीलच एक होते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक बॉग्डॅन झेकोवस्की. त्यांनी या छावणीत राहत असतानाच रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीचे भाषांतर करायला सुरूवात केली होती.
“द सेकंड होमलॅंड’ या पुस्तकात लेखिका अनुराधा भट्टाचार्य यांनी पोलिश निर्वासितांचा मुद्दा मांडताना म्हटले आहे की ब्रिटीश अधिकार्यांमध्ये काहीजणांना या मानवतावादी समस्येची काळजी होती आणि इतर त्याबाबत अलिप्त होते, त्यात कॅप्टन वेबही होता, लेखिका म्हणते की त्याने पोलंडच्या या विस्थापितांविरोधात कारण नसताना शत्रुत्व दाखवले. त्यांना मित्रापेक्षा शत्रू म्हणूनच ब्रिटीशांनी वागवले असे भट्टाचार्य यांनी म्हटले आहे, आणि इतकेच नाही तर ते जर्मन युद्धकैदी आहेत,अशा पद्धतीनेच त्यांना वागवण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलंडच्या विस्थापितांना मिळालेली प्रेमाची उब, काळजी आणि माणुसकी यामुळे पोलंडच्या लोकांच्या मनात कोल्हापूरविषयी कायम आपुलकी आणि ममत्व राहिले.
२०१४ मध्ये पोलंड, अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, प. आशिया आणि दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेल्या सुमारे ७५ माजी विस्थापितांनी कोल्हापुरातील आपल्या वास्तव्याच्या स्मृती जागवण्यासाठी ४ आणि ५ मार्च २०१४ रोजी कोल्हापूरला भेट दिली होती. १९४८ मध्ये छावणी सोडल्यावर ६५ वर्षांनी ते पुन्हा या शहरात आले. त्यांचा जन्म जरी वळीवडेत झाला होता किंवा ते त्यावेळी ४ ते १० वर्षे वयोगटातील मुले होती, त्यावेळी. त्या संस्मरणीय अशा भेटीच्या वेळी पोलंडचे कॉन्सुल जनरल लेस्झेक ब्रेंडा यांनी पोलिश कौन्सिल फॉर द प्रोटेक्शन ऑफ मेमरी ऑफ कम्बॅट अँड मार्टरडमचे पोलिश मंत्री आणि अधिकारी यांच्यासमवेत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली आणि कोल्हापूरच्या राजघराण्याने संकटकाळात दाखवलेल्या औदार्य,मानवतावादी आणि माणुसकीबद्दल पोलंडच्या जनतेच्या मनात कायम कृतज्ञता असेल, अशी भावना व्यक्त केली. ब्रेंडा हेछत्रपती शाहू महाराजांना म्हणाले की, “कोल्हापूर शहर आणि येथील लोकांबरोबर आमचे दृढ बंध आहेत. तुम्ही आमच्या कुटुंब आणि मुलांचे आमच्या देशाच्या अतिशय शोकात्म अशा कालखंडात रक्षण केले. तुमच्या छावणीत जे लोक राहत होते,ते आता वृद्ध झाले आहेत, तरीही मिडिया आणि सोशल फोरमवरून ते एकमेकांच्या संपर्कात आहेत.’ ताराबाई राणीसाहेब चौकाजवळ असलेल्या पोलिश कबरस्तानालाही त्यांनी भेट दिली, तेथे ७८ निर्वासितांचे दफन करण्यात आले होते. ब्रेंडा यांनी पुढे म्हटले, “जेव्हा वळीवडेची पोलिश मुले म्हणतात की, भारत ही आमची दुसरी जन्मभूमी आहे, तेव्हा त्यांच्या मनात भारतीय लोक असतात.’ आणि “वळीवडेतील दिवस हा माझ्या बालपणीचा सर्वात आनंददायी काळ होता. जे प्रेम आम्हाला मिळाले, त्याची परतफेड आम्ही कशी करू शकू?’
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षि छत्रपती शाहू महाराजांपासून ते दुसरे महायुद्ध आणि पोलिश समस्यापर्यंत आपल्या महान पूर्वजांनी निर्माण केलेला इतिहास प्रत्यक्षपणे जगत, खासदारसंभाजीराजे छत्रपती यांनी एक असामान्य आणि सक्रीय संसदपटू म्हणून आपल्या उदात्त घराण्याची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. दहाव्या आशिया-युरोप संसदीय सहयोगी बैठकीत, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी युरोपियन युनियन/आशियाई सहकार्याचे महत्व अतिशय जोरकसपणे मांडले. युरोपियन-आशियाई दृष्टीकोन हा केवळ वाक्प्रचार नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. युरोपियन युनियन आणि आशियातील देशांपुढे अशी काही आव्हाने आहेत, ज्यासाठी दोघांना परस्परांचे सहकार्य घेणे अनिवार्य आहे. कोणताही मुद्दा मग तो आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी,दहशतवाद, मूलतत्ववाद, वंशवाद, हवामान बदल, समान पर्यावरणीय संस्कृतीचे रक्षण,स्थलांतर, खुला व्यापार, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचे कार्यक्रम आणि असे कितीतरी विषय आहेत, ज्यावर एकच बाजू उपाययोजना करेल, असे होणार नाही. “या बैठकीला युरोपियन युनियनचे सर्व सदस्य राष्ट्रे आणि युरोपियन युनियनचे सदस्य नसलेली रशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, आसेम आणि एएसइपी चे सदस्य यांची उपस्थिती दर्शवते की बहुपक्षीय संवादासाठी अत्यंत चांगले आणि असामान्य असे हे व्यासपीठ आहे.
Leave a Reply