
ब्रुसेल्स : १९९० मध्ये हवामान बदलावरील आंतरसरकारीय मंडळ (आयपीसीसी) ने तयार केलेलेल्या समीक्षणात्मक अहवालात प्रथम हवामान बदलामुळे होणा-या विस्थापनाचा मुद्दा मांडण्यात आला. हवामान बदल हा जगभरातील लोकांच्या विस्थापनाचे एक प्रमुख कारण आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येथे केले.
येथे आयोजित करण्यात आलेल्या १०व्या आशिया-युरोप संसदीय सहयोगी बैठकीत संभाजीराजे बोलत होते. ते पुढे म्हणाले की संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली आंतरराष्ट्रीय स्थलांतराच्या विविध पैलूंवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अलिकडेच चर्चा झाली. या चर्चेदरम्यान हवामान बदलामुळे होणारे स्थलांतर या मुद्यावर अधिक गांभिर्याने चर्चा झाली.
ते म्हणाले की स्थलांतर ही जागतिक अर्थव्यवस्थेतील एक स्वयंप्रेरित अशी एक प्रक्रिया आहे, आणि ती या अर्थव्यवस्थेचा एक अभिन्न भाग आहे. अनेक व्यावसायिक,कामगार, व्यापारी, विद्यार्थी विविध कारणांसाठी स्थलांतर करत असतात. अचानक येणा-या नैसर्गिक आपत्ती या हवामान बदलाच्या हळूहळू होणा-या परिणामांपासून वेगळ्या केल्या पाहिजेत अशी भारताची भूमिका आहे यावर संभाजीराजे यांनी भर दिला. नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या स्थलांतराकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले. हवामान बदलामुळे स्थलांतर होते हे मान्य करण्यात आले असले तरी ‘पर्यावरणीय स्थलांतर’ याची नेमकी वैध आणि सर्वमान्य व्याख्या अद्याप करण्यात आलेली नाही आणि यासंदर्भातील ग्लोबल कॉम्पॅक्ट ऑन मायग्रेशन या विषयावरील मसुदाही अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
Leave a Reply