
कोल्हापूर: भागीरथी महिला संस्थेच्या झिम्मा फुगडी स्पर्धेचा निकाल शनिवारी रात्री जाहीर झाला. मार्केट यार्ड जवळील रामकृष्ण लॉनवर महिलांच्या प्रचंड गर्दीत, जल्लोषी वातावरणात बक्षिस वितरण सोहळा पार पडला. झिम्म्याचं प्रथम क्रमांकाचं २५ हजार रुपयांचं बक्षिस,राधानगरी तालुक्यातील कासारवाडा इथल्या माऊली महिला बचत गटानं पटकावलं. तर सानेगुरूजी वसाहतीतील एस जी ग्रुपनं दुसरा क्रमांक, आणि राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या बाळूमामा महिला बचत गटाला तिसरा क्रमांक मिळाला. तर युवती झिम्मा गटात संध्यामठ गल्लीतील शिवाजी पेठ ग्रुप मंडळाला पहिला क्रमांक मिळाला. राधानगरी तालुक्यातील मानेवाडी इथल्या रेणूका युवती गटानं दुसरा, तर गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे इथल्या ज्योतिर्लींग ग्रुपनं तिसरा क्रमांक पटकावला. एकूण ५ लाख रुपयांची बक्षिसं देणारी पश्चिम महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेला दरवर्षी महिलांचा प्रतिसाद वाढतोय, ही आनंदाची बाब असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. सध्या गाजत असलेल्या सुर राहू दे या मालिकेतील गौरी नलवडे आणि तु अशी जवळी रहा, या मालिकेतील तितीक्षा तावडे यांची उपस्थिती लाभली. महिलांनी जल्लोष करत बुधवारची सायंकाळ आनंदात घालवली. या स्पर्धेमुळं अनेकांना भव्य मंचावर आपली कला सादर करण्याची संधी प्राप्त झाली.
धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं शनिवारी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेचं हे नववं वर्ष होतं. बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून सुरु झालेली ही स्पर्धा, रात्री ९ वाजेपर्यंत सुरु होती. सुमारे ९ हजार महिलांनी या स्पर्धेत आपल्या कौशल्याचे रंग भरत, स्पर्धा यशस्वी केली. दरम्यान बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झी युवा वाहिनीवरील सध्या गाजत असलेल्या सुर राहू दे या मालिकेतील गौरी नलवडे आणि तु अशी जवळी रहा, या मालिकेतील तितीक्षा तावडे यांची दमदार एंट्री झाली. त्यांना बघताच उपस्थित महिलांनी मैेदान अक्षरशः डोक्यावर घेतलं. यावेळी गौरी नलवडे आणि तितीक्षा तावडे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा पार पडला. पारंपारिक वेशभूषा, छुई फुई, घागर घुमवणे, सूप नाचवणे, काटवट काणा, फुगडी, उखाणे, जात्यावरील ओव्या आणि झिम्मा अशा विविध विभागात विजेत्या ठरलेल्या महिलांना खासदार धनंजय महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, कलाकार गौरी नलवडे आणि तितीक्षा तावडे, पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरवण्यात आलं. वेशभूषा स्पर्धेत हातकणंगले तालुक्यातील लाटवडे इथल्या प्रियांका पाटील विजेत्या ठरल्या. तर वड्डवाडी इथल्या नकुशा खोत उपविजेत्या ठरल्या. छुई फुई स्पर्धेत राधानगरी तालुक्यातील सोळांकुर इथल्या लता कदम या विजेत्या तर गगनबावडा तालुक्यातील वेतवडे इथल्या वंदना शिंदे या उपविजेत्या ठरल्या. तर घागर घुमवणे स्पर्धेत गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे इथल्या शितल पाटील विजेत्या, तर करवीर तालुक्यातील वड्डवाडी इथल्या सुरेखा कात्रे उपविजेत्या ठरल्या. जात्यावरील ओव्यांमध्ये करवीर तालुक्यातील जैताळ इथल्या पुनम पाटील विजेत्या तर, मंगळवार पेठेतील अनिता टिपुगडे या उपविजेत्या ठरल्या आणि शांताबाई पाटील, आक्काताई मोरे, पार्वती परिट यांनीही बाजी मारली. उखाणा स्पर्धेत उत्तरेश्वर पेठेतील आर्पिता राबाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या सारीका पाटील दुसर्या क्रमांकावर राहिल्या. फुगडीमध्ये मंगळवार पेठेतील रिया वळिवडेकर, तनुश्री नार्वेकर यांच्या जोडीनं प्रथम, तर गजानन महाराज नगर इथल्या प्रिती कदम, ज्योती कदम या जोडीनं दुसरा क्रमांक आणि कदमवाडी इथल्या अंजली शेळके, सुचिता शेळके या जोडीनं तिसरा क्रमांक पटकावला. सूप नाचवणे स्पर्धेत करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या रूपाली बराले यांनी प्रथम तर भुदरगड तालुक्यातील पाण्याचा हुडा इथल्या लक्ष्मी राणे यांनी बाजी मारली. घोडा-घोडा स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी इथल्या संगीता रेडेकर या विजेत्या तर वाळोली इथल्या सरीता म्हासुलकर या उपविजेत्या ठरल्या. काटवट काणामध्ये हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वाठार इथल्या विद्या इंगळे, वड्डवाडी इथल्या अश्विनी कात्रे, कागल तालुक्यातील निढोरी इथल्या प्रतिक्षा सुतार यांनी क्रमांक पटकावले. यंदा झिम्मा प्रकारात १५ ते २० वयोगटातील युवतींसाठी वेगळा गट निर्माण केला होता. त्यामध्ये कोल्हापुरातील संध्यामठ गल्लीतील शिवाजी पेठ ग्रुप मंडळाला पहिला क्रमांक मिळाला. राधानगरी तालुक्यातील मानेवाडी इथल्या रेणूका युवती गटानं दुसरा, तर गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे इथल्या ज्योतिर्लींग ग्रुपनं तिसरा क्रमांक पटकावला. सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या झिम्मा स्पर्धेमध्ये राधानगरी तालुक्यातील कासारवाडी इथल्या माऊली महिला बचत गटानं प्रथम क्रमांक पटकावला. या मंडळाला २५ हजार रुपयांचं बक्षिस देवून गौरवण्यात आलं. सानेगुरूजी वसाहत इथल्या एस जी ग्रुपनं २० हजार रुपयांचं दुसर्या क्रमांकाचं बक्षिस पटकावलं. तर राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या बाळूमामा महिला बचत गटानं १५ हजार रुपयांचं तिसर्या क्रमांकाचं बक्षिसमिळवलं.बिद्री इथल्या गीता भागवत महिला मंडळ, शिंगणापूर इथल्या महालक्ष्मी बचत गट, चंदगड तालुक्यातील बोंजुर्डे इथल्या विठ्ठल रखुमाई महिला बचत गट, तर पन्हाळ गडावरील जिजाऊ महिला मंडळ यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची बक्षिसं देण्यात आली. सर्व गटातील सुमारे २५ ते ३५ स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली. महिलांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळं, ही स्पर्धा दरवर्षी अधिक व्यापक बनत चाललीय. झिम्मा फुगडी यासह विविध पारंपारिक खेळांचं जतन करण्याचं महत्वाचं कार्य भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून अरूंधती महाडिक यांनी केलंय. सामाजिक जाणिवेचं भान राखून लेक वाचवा, स्त्रीभ्रूण हत्या, स्वच्छ सुंदर भारत, पर्यावरण रक्षण यासह विविध संदेश देण्यात ही स्पर्धा यशस्वी ठरली असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. सातत्यानं आम्ही विविध उपक्रमांचं आयोजन करतोय, आजपर्यंत खासदार म्हणून कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशिल असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान पारितोषिक वितरण सोहळ्यापूवर्ी गायक मुस्ताक तहसिलदार आणि नीता क्षीरसागर यांनी एकाहून एक बहारदार गीतं सादर करत, उपस्थितांची वाहवा मिळवली. भागीरथी महिला संस्थेच्या सभासद वर्षा जोशी यांनी, नटरंग चित्रपटातील गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केलं. दरम्यान ७ वर्षाच्या अनुष्का वायंगणकर या मुलीनं पर्बत के इस पार.. या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. शाहुवाडी तालुक्यातील पाल इथल्या महालक्ष्मी बचत गटातील महिलांनी जाफोरी हे वेगळ्या प्रकारचं नृत्य सादर करून, वाड्यावस्त्यावर वास्तव्य करणार्या महिलांच्या अशा वेगळ्या नृत्याचं दर्शन घडवलं. झिम्मा फुगडी स्पर्धेअंतर्गत मिसकॉल द्या आणि बक्षिसं जिंका या योजनेचं आयोजन करण्यात आलं होतं. अर्जुन ऑईल आणि अग्रवाल गोल्डच्या वतीनं २० पेक्षा उपस्थितांना बक्षिसं देण्यात आली. बक्षीस वितरण सोहळ्यानंतर उपस्थित महिलांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरत मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला. या स्पर्धेसाठी ३५ परीक्षक आणि १४ निवेदकांनी काम पाहिलं. सहजसेवा ट्रस्टनं ९ हजारांहून अधिक स्पर्धकांची भोजनाची व्यवस्था केली. सहजसेवा ट्रस्टच्या सन्मती मिरजे, किरण शहा, अरविंद परमार, प्रमोद पाटील, चेतन परमार, मनिष पटेल, लक्ष्मीदास पटेल, रोहित गायकवाड, संकेत पाटील, शिवतेज पाटील यांनी त्यासाठी योगदान दिलं. या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून जी एस चहा आणि माध्यम प्रायोजक म्हणून रेडिओ सिटी होते. बुधवारी दिवसभर सुरु असलेली स्पर्धा आणि बक्षिस वितरणाचा जल्लोष, जिल्ह्यातील लाखो प्रेक्षकांनी चॅनेल बी च्या थेट प्रक्षेपणातून घरबसल्या अनुभवला. यावेळी सौ. मंगल महाडिक, शकुंतला महाडिक, मंगल महाडिक, नगरसेविका रूपाराणी निकम, माधुरी नकाते, पुजा नाईकनवरे, उमा इंगळे, अर्चना पागर, जयश्री जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply