
कोल्हापूर : कोल्हापूर आभूषणम 2018 च्या माध्यमातून स्थानिक उत्पादक व्यावसायिकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल कोल्हापूर,कोल्हापूर सराफ व्यापारी संघ, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने येत्या 6 व 7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर आभूषणम 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये चार हजारहून अधिक सुवर्णकार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले “स्थानिक सराफ उत्पादकांच्या व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने गेल्या वर्षी पासून ‘आभूषणम’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. मागील वर्षी या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून हॉटेल सयाजी मध्ये हे भव्य हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, सोलापूर, कर्नाटक व गोवा राज्यातील सराफ व्यावसायिक उपस्थित असणार आहेत. याचबरोबर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल, उपाध्यक्ष अनंत पद्मनाभन, समन्वयक अशोककुमार जैन, सहसमन्वयक राजेश रोकडे, अशोककुमार बरडीया,जी. व्ही. श्रीधर, जयंतीलाल चलानी, मनोज कुमार झा,नितीन कदम, संजय जैन यांच्यासह सदस्यांनाही आमंत्रित केले आहे. उत्पादकांची बाजारपेठ विस्तारावी या उद्देशाने या प्रदर्शनाच्या प्रसिद्धीसाठी संघाच्या वतीने 6 शहरात रोड शो चे आयोजन केले आहे. त्याचबरोबर प्रदर्शनात सराफ व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचे एकूण चाळीस स्टॉल असणार आहेत. यामुळे एकूणच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष व्यवसाय वाढवण्यासाठी व कक्षा रुंदावण्यासाठी देवाणघेवाणी बरोबरच व्यवसायासमोरील अडचणींवर मात करण्यासाठी हे प्रदर्शन नक्कीच उपयोगी पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.पत्रकार परिषदेला संघाचे उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव माणिक जैन,विजय हावळ यांच्यासह पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.
Leave a Reply