
(पत्रकार रवी कुलकर्णी) सध्याच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या युगात माणूस आपली मनःशांती हरवून बसला आहे. आर्थिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणावर आहे. सर्व सुखं पैशाने विकत घेतली जात आहेत. मात्र, मनःशांती कुठंच विकत मिळेना, अशी स्थिती निर्माण झाली. पण ओम शांती! या शब्दोच्चारानं मनःशांतीची अनुभूती माऊंट आबू (राजस्थान) स्थित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सर्वांना देत आहे. जगातील १४० देशात ८ हजार ५०० शाखा आणि १८ लाख सदस्य असा व्याप असणार्या संस्थेच्या माऊंट आबू मुख्यालयाला भेट देण्याचा योग नुकताच आम्हा कोल्हापुरातील पत्रकार कुटुंबीयांना आला. अध्यात्मिक अनुभूतीची एक नेहमीपेक्षा वेगळी सहल…. असंच या सहलीचं वर्णन करता येईल….
गुजरातचे एक प्रख्यात हिरे व्यापारी, ऐश्वर्यसंपन्न म्हणजे ज्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरत होती, असं व्यक्तिमत्त्व म्हणजे दादा लेखराजे! ऐश्वर्यसंपन्नता असूनही त्यांचे मन अध्यात्मकडे ओढले गेले आणि त्यांनी सर्वसंग परित्याग करून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची स्थापना १९३७ ला केली. त्यानंतर ते प्रदीर्घ काळ संस्थेच्या अध्यक्षपदावर राहिले. सध्या त्यांच्याच विचाराचा प्रसार करणार्या आणि वयाची १०२ वर्षं पूर्ण झालेल्या दादी जानकीजी संस्थेच्या प्रमुख आहेत. सध्या या संस्थेचा व्याप भारतासह जगातील १४० देशांत पसरला असून, ८ हजार ५०० शाखांसह १८ लाख स्त्री-पुरुष सदस्य समर्पित भावनेनं ओम शांतीच्या… माध्यमातून अनुयायांना अध्यात्मिक अनभूती देत आहेत. माऊंट आबू (राजस्थान) इथं यांचे मुख्यालय आहे. या ठिकाणी आम्हा कोल्हापुरातील पत्रकारांनी कुटुंबीयांसह २० ते २६ सप्टेंबर या कालावधीत भेट दिली. त्यांचे मधुबन, ज्ञानसरोवर, पीसपार्क, पांडव भवन या ठिकाणी भेट दिली. पहाटे ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत विविध वक्ते मेडिटेशनद्वारे अध्यात्म समजून सांगतात. आत्मा-परमात्मा यांच्यातील परस्पर संबंध, मनातील विकार दूर कसे करावेत, हे सहज सोप्या भाषेत समजून सांगतात. आमच्या समन्वयक म्हणून गीता बहेन यांच्याबरोबरच रघुनाथभाई आणि कदमभाई यांचंही खूप चांगलं सहकार्य मिळालं. याच कालावधीत देशातील सर्व पत्रकारांची एक कार्यशाळासुद्धा पार पडली. यामध्ये पत्रकारिता आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालावी आणि समाजात अध्यात्म कसं रुजवावं, याची शिकवण मिळाली. देशातील सर्वाधिक मोठा अशी ख्याती असणारा सोलर प्रकल्प याच ठिकाणी पाहायला मिळाला. अवघ्या एका तासात २० हजार लोकांचे जेवण, चहा पाणी नाष्टा बनवण्याची किमया या सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून घडते. माऊंट आबू केंद्रापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर गुजरातच्या हद्दीत असणार्या अंबाजी मंदिरालाही भेट देण्याचा योग आला. महाराणा प्रतापसिंह यांनी सन १७५६ मध्ये मोगलांच्या विरुद्ध हळदी घाटात केलेली घनघोर लढाई आणि त्यांच्या चेतक घोड्याचे बलिदान हा रोमांचक इतिहासही पाहायला, अनुभवायला मिळाला. कठपुतळ्यांचे खेळ असणारे लोककला केंद्र, महाराणा प्रतापसिंह वस्तू संग्रहालय फतेह सागर, उदयपूरचे राजे यांचा भव्य राजवाडा, सागरेश्वर मंदिर, पहेली की बेडी, उंचावर असणोर गुरू शिखर मंदिर, नक्वी झील, दिलवाडा मंदिर आदी ठिकाणांना भेटी देऊन पर्यटन आणि खरेदीचा मनसोक्त आनंद आम्ही सर्वांनी लुटला. या अध्यात्मिक सहलीमध्ये पत्रकार सर्वश्री रंगराव हिर्डेकर, राजेंद्र पाटील, रंकाळा चौफेरचे जाधव परिवार, क्रांतीसिंहच्या सुनंदा मोरे, स्पीड न्युज चे शुभांगी तावरे, अक्षय थोरवत, राहुल खाडे, प्रा. दिनेश डांगे परिवार सहभागी झाले होते. एकूणच आपण विविध कारणांनी सहलीला जातो. पण माऊंट आबूस्थित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची ही सहल खरोखरच अध्यात्मिक अनुभूतीची सहल ठरली.
Leave a Reply