राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धा: विद्यापीठास सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात गेल्या दोन दिवसांपासून उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ‘जश्न-ए-कव्वाली’ अर्थात तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेत यजमान शिवाजी विद्यापीठाच्या संघाने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. मुंबई विद्यापीठाच्या संघाला सह-विजेतेपद जाहीर करण्यात आले.शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात आज सायंकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, रियाझ खान व विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषी वातावरणात पार पडला. रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरुप आहे. 
स्पर्धेत द्वितिय क्रमांक तीन विद्यापीठांच्या संघांना विभागून देण्यात आला. यामध्ये महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक (हरियाणा), लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा (पंजाब) आणि बनस्थळी विद्यापीठ, राजस्थान यांचा समावेश आहे.तृतीय क्रमांकही तीन विद्यापीठ संघांना विभागून देण्यात आला. यामध्ये डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, सागर (मध्य प्रदेश), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचा समावेश आहे.पारितोषिक वितरण समारंभापूर्वी बनस्थळी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या तीन संघांनी उपस्थितांसाठी कव्वालीचे विशेष सादरीकरण केले. यावेळी भाषा भवन सभागृह रसिकांनी अक्षरशः तुडुंब भरून गेले होते. प्रत्येक सादरीकरणाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता. शिवाजी विद्यापीठ संघाच्या सादरीकरणावेळी तर हा प्रतिसाद शिगेला पोहोचला. यजमान संघाच्या सादरीकरणाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.तत्पूर्वी, आज सकाळी नऊ वाजल्यापासून स्पर्धेतील उर्वरित संघांचे सादरीकरण झाले. यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक (हरियाणा) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या संघांनी सादरीकरण केले. या समारंभास शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य, अधिष्ठाता व अन्य अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!