
कोल्हापूर : वायकॉम18 मोशन पिक्चर्स, द स्टुडिओ बायोपिक्सच्या उल्लेखनीय सादरीकरणासाठी प्रसिध्द आहे आणि आता ते सज्ज आहेत मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी ‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’या सिनेमाद्वारे. या सिनेमाची पहिली झलक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आली आणि आज सोशल मिडीयाद्वारे त्याची दुसरी झलक प्रदर्शित झाली आहे.
सशक्त व्यक्तिमत्व असलेल्या डॉ.काशिनाथ घाणेकरांची भूमिका पडद्यावर साकारत आहे अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे. सुबोध भावे मराठीच्या पहिल्या सुपरस्टारची भूमिका साकारण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी लहानपणापासून रंगभूमी काम करणाऱ्या अनेक कलाकारांविषयी ऐकत आलो आहे, परंतु मला रंगभूमीमध्ये जास्त रस नव्हता, त्यामुळे मी त्यांची काम पाहू शकलो नाही… परंतु त्यांच्या विषयी मला विलक्षण आदर मनामध्ये होता. या सर्वांचे काम मी बघू शकलो नाही याची खंत मला आयुष्यभर मनामध्ये राहील. या सिनेमाच्या निमित्ताने, मला डॉ.काशिनाथ घाणेकर आणि त्यांचे काम जाणून घेता आले. या चित्रपटामध्ये काम केल्यामुळे मला मराठी रंगभूमीवर परत आल्यासारखे वाटत आहे.”चित्रपटाच्या संपूर्ण टीमने कोल्हापूर मध्ये पत्रकारांशी मुक्त संवाद साधला.
१९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या “आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर” मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे, त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमय रीत्या बदलून टाकला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जगणाऱ्या रंगभूमीच्या सम्राटाचे आयुष्य येत्या दिवाळीत म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी मोठया पडद्यावर उलगडणार…२०१८ च्या आरशात रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा मागोवा.
Leave a Reply