निगवे खालसा कुस्ती विकासासाठी १० लाख रूपयांचा निधी: खा.धनंजय महाडिक

 

कोल्हापूर: कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या निगवे खालसा गावातील तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि तरुण पिढी व्यसनापासून दूर रहावी, यासाठी खासदार फंडातून १० लाख रुपयांचा निधी दिलाय. इथले अनेक पैलवान गावाचं आणि देशाचं नाव उज्वल करतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथल्या खुबलढ आखाडा तालीम मंडळाच्या इमारतीच्या भूमी पूजन प्रसंगी ते बोलत होते.
करवीर तालुक्यातील निगावे खालसा गावाला कुस्तीची परंपरा लाभली आहे. इथले पैलवान सोनबा गोंगाने यांनी नुकताच जागतिक कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजन गटात जगात ६ वा क्रमांक मिळवलाय. याबद्दल सर्व ग्रामस्थांनी त्याचं कौतुक केलं. खासदार धनंजय महाडीक यांनीही तांबड्या मातीतील रांगडी परंपरा जोपासण्यासाठी खुबलढ तालीम मंडळाला खासदार फंडातून १० लाख रुपये आणि ग्रामपंचायतीनं १० लाख रुपयांचा निधी दिला. खासदार धनंजय महाडिक, सरपंच पांडुरंग महाडेश्वर, जिल्हा परिषद सदस्य संध्याराणी बेडगे, प्रताप पाटील कावणेकर, बचाराम किल्लेदार यांच्या हस्ते तालमीचं भूमी पूजन करण्यात आलं. निगवे ग्रामस्थांच्या वतीनं खासदार महाडिक यांचा गौरव करून, गावातून मिरवणूक काढण्यात आली. निगवे खालसा सहकारी ग्राहक संस्थेच्या वतीनंं सुरु केलेल्या हनुमान बाजाराचं उद्घाटनही खासदार महाडिक आणि जिल्हा परिषद सदस्या संध्याराणी बेडगे यांच्या हस्ते करण्यात आलं. गेल्या चार वर्षात खासदार धनंजय महाडिक यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. याचबरोबर चार वर्षात संसदेत देशात सर्वाधिक प्रश्न मांडण्याचे काम त्यांनी केलं आहे. त्याबद्दल त्यांना दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळं पुढचे खासदारही महाडिक असतील, असा विश्‍वास सरपंच पांडुरंग महाडेश्वर यांनी व्यक्त केला. निगवे ग्रामस्थांनी यापूर्वीही आम्हाला मोलाची साथ दिली आहे. गावच्या विकासासाठी आपण कटीबद्द आहे. इथल्या तरुणांना व्यायामाची सवय लागावी आणि व्यसनाधीनता कमी व्हावी, यासाठी आधुनीक पद्धतीची तालीम उभी करणार आहोत, असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. गेल्या चार वर्षात आपण ११२२ प्रश्न संसदेत मांडले, अनेक विकासकामं मार्गस्थ लावली आहेत. त्यामुळं यावेळीही प्रचंड मतानं आपला विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रताप पाटील, उपसरपंच अशोक किल्लेदार, सदाशिव पाटील, नामदेवराव चौगले, जगदीश चौगले, वसंत पाटील, अशोक पाटील, रमेश चौगले, मारुती ढवण, शहाजी शिंदे, तुकाराम किल्लेदार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!