
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना समाजाभिमुख संशोधनासाठी प्रेरित करण्याची मोठी जबाबदारी मार्गदर्शकांवर आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे यांनी आज येथे केले. विद्यापीठात आयोजित आविष्कार संशोधन महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ.पी.ए. अत्तार प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातर्फे महोत्सवाचे संयोजन करण्यात आले आहे.डॉ. मोरे यांनी आपल्या भाषणात आविष्कारच्या आयोजनामागील भूमिका तसेच मार्गदर्शकांवरील जबाबदारीही सविस्तरपणे विषद केली. ते म्हणाले, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल व कुलपती एस.एम. कृष्णा यांनी सन २००६मध्ये विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी आविष्कार संकल्पना मांडली आणि तेव्हापासून महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय स्तरावर या महोत्सवाचे आयोजन केले जाते. देशाला तक्षशीला, नालंदा विद्यापीठांपासून संशोधनाचा प्राचीन वारसा लाभलेला आहे. असे असले तरी, आजघडीला मूलभूत व समाजाभिमुख संशोधन होण्याची नितांत गरज आहे. उच्चशिक्षणाच्या प्रवाहात मोठ्या संख्येने समाविष्ट होत असलेल्या तरुण विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. केवळ लोकसंख्यात्मक पातळीवर भारत महासत्ता होणे अशक्य असून त्यासाठी सृजनात्मकता व नवनिर्मितीला चालना देणारे संशोधन आवश्यक आहे. त्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना तसा विषय देण्याची आणि संशोधन करवून घेण्याची जबाबदारी मार्गदर्शकांनी स्वीकारायला हवी. अशा संशोधनाला चालना देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना घोषित केल्याची माहितीही त्यांनी दिली.यावेळी इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ.एम.एल. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आविष्कारचे समन्वयक डॉ.ए.एम. गुरव यांनी आभार मानले.या औपचारिक उद्घाटन समारंभानंतर विद्यापीठाच्या लोककला केंद्रात मांडण्यात आलेल्या संशोधन प्रदर्शनाचे बीसीयुडी संचालक डॉ. मोरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठीय पदव्युत्तर संशोधक, विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रदर्शनात सुमारे १५० पोस्टर व मॉडेल्स प्रदर्शित केली आहेत. या सर्वांची मान्यवरांनी फिरून पाहणी केली व विद्यार्थ्यांकडून त्यांच्या संशोधनाविषयी जाणून घेतले.
Leave a Reply