
कोल्हापूर: रूग्णाला काय लागते ते ओळखून बहुउपचारवादी चिकित्सा पद्धती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी. या स्वरूपातील चिकित्सा पद्धती प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी असावी. देशाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी औषधे ही भारतीय उत्पादकांकडून घ्या. परदेशी औषधांचे आकर्षण सोडून द्या, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ येथे केले.कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील सिद्धगिरी अडव्हान्सड न्यूरो सायन्स अँड रिसर्च युनिट (संस्कार) विभागातील नव्या न्युरोनेव्हिगेशन सिस्टीम या मशीन प्रणालीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत, सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी, सर सहकार्यवाहक भागैय्याजी , प्रांतचालक नानाजी जाधव,संस्कार विभागाचे प्रमुख मेंदू सर्जन डॉ.शिवशंकर मरजक्के , धर्मादाय उपायुक्त शशिकांत हेर्लेकर, अखिल भारतीय ग्रामविकास प्रकल्पाचे प्रमुख डॉ. दिनेश यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.सरसंघचालक भागवत म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आता आरोग्य आणि शिक्षण निकडीचे बनले आहे. आरोग्य सुविधा, वैद्यकीय शिक्षण खर्चिक बनले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी झालेला खर्चाच्या तुलनेत कमाई करण्यासाठी अनेकजण शहरात जावून रूग्णालय, दवाखाने सुरू करतात. त्यामुळे ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. अशा स्थितीत उपचारपद्धतीचा अभिनिवेष सोडून देऊन ज्या विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्या एकाच छताखाली आणून बहुउपचारवादी चिकित्सा पद्धती ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.उत्तम आणि स्वस्त औषधे आपला देश जगाला देतो. त्याला जनतेने प्रतिसाद द्यावा. महाग पडत असतील, तरी भारतीय उत्पादकांकडूनच औषध घ्यावीत. सहसरकार्यवाह भागैय्या म्हणाले, सिद्धगिरी मठ हा समाजाला जागृत करण्याचे काम करीत आहे. जीवनाला योग्य दिशा देण्याची साधना येथे होत आहे. वैद्यकीय सेवाही समाजाची आराधना आहे.काडसिद्धेश्वर स्वामींनी मार्गदर्शन करताना म्हणाले , सामाजिक सेवा विभाग व वेगवेगळया धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांसाठी भविष्यात सिद्धगिरी हॉस्पिटल नो कॅश काउंटर करण्याचा संकल्प व्यक्त केला.ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी केलेल्या दिग्विजय मोहिते(कोल्हापूर) या रूग्णाचे वडील लक्ष्मण मोहिते यांनी न्यूरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के व त्यांच्या टीमचे मनोगतातून आभार व्यक्त केले. तसेच संस्कार विभागातील मेंदू व मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या ५० लहान मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. मेंदू सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी प्रास्ताविक केले. अक्षय नलवडे-जहागिरदार यांनी सूत्रसंचलन तर मेंदू भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर यांनी आभार मानले.
Leave a Reply