शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी:आ.राजेश क्षीरसागर 

 

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पडलेला डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूचा विळखा सुटत नसल्याचे दिसते. या साथींच्या रोगात नागरिकांचे जीव जात असून, प्रशासन गप्प बसले आहे. बारा दिवसांपूर्वी डेंग्यूने उदयोन्मुख युवा फुटबॉल खेळाडूचा, तर स्वाईन फ्ल्यूने वृद्ध डॉक्टरांचा बळी घेतला. एकीकडे साथीच्या रोगांनी शहरात थैमान घातले असताना प्रशासन आपली जबाबदारी झटकून याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. वेळीच उपाययोजना न झाल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोल्हापूर शहरात अशा रोगांसाठी सीपीआर हा एकमेव दवाखाना असल्याने कोल्हापूर शहर व जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील रुग्णांचा भार सीपीआर रुग्णालयावर पडत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेने घ्यावी. याकरिता महापालिकेचे दवाखाने व वॉर्ड दवाखाने यंत्रसामुग्री, कर्मचारी व औषधानी सुसज्ज करावेत, अशा सुचना आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अभिजित चौधरी व उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरात थैमान घातलेल्या डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज सीपीआर रुग्णालय येथे कोमनपा आयुक्त, महानगरपालिकेचे आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी बोलातना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू या साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. हे साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने काय प्रयत्न केले. गेल्या काही दिवसात अनेक रुग्ण दगावले आहेत. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही कोल्हापूर महानगरपालिकेची असताना कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन काय काम करीत आहे. या साथीच्या रोगांवर प्रतिबंध आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत आजही अनेक नागरिकांमध्ये पुरेशी माहिती नाही, त्यामुळे या रोगांचा फैलाव थांबविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी महापालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या. अशा अचानक येणाऱ्या रोगराईळा तोंड देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. शहरात उघड्यावर असणारे कोंडाळे, वेळेवर न होणारा कचरा उठाव, स्वच्छता विभागाचे कर्मचारी कामावर हजर नसणे, अशा प्रकारामुळे या रोगराईत वाढ होत आहे. यावर कोणाचे नियंत्रण नाही. लाईन बझार येथील झूम प्रकल्प गेली अनेक वर्षे बंद आहे. त्यावर नियुक्त केलेल्या कंपन्याना महापालिका प्रशासन पाठीशी घालते का? महानगरपालिकेचे दवाखाने सुसज्ज आहेत का? महापालिकेचे दवाखाने सुसज्ज नसल्याने नागरिकाना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. गोरगरीब रुग्णांची परवड होत असताना महापालिका आरोग्य विभाग याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. कोल्हापुरात महानगरपालिकेचे किती दवाखाने कार्यरत आहेत. मुंबई, पुणे शहरात तेथील महापालिका प्रशासनाने स्थानिक दवाखाने सुसज्ज ठेवले आहेत. त्याच पद्धतीने महानगपालीकेचे पंचगंगा, सावित्रीबाई फुले, आयसोलेशन दवाखाने सुसज्ज करा, या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाचे उपचार होत असल्याने नागरिक उपचारासाठी येत नाहीत. आरोग्य सेवेला महापालिकेतून वाढीव बजेट द्या, सर्वच दवाखाने एकदम सुधारणा होणे शक्य नसल्यास एक दवाखाना प्राधान्याने सुसज्ज करावा, यासाठी इतर ट्रस्ट व संस्थाकडून निधी व यंत्रसामुग्री मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही देत शहरातील नागरिकांच्या आरोग्याची सर्वस्वी जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेची असून, महापालिकेचे दवाखाने सुसज्ज करा, अशा सुचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
याबाबत बोलताना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी, आरोग्य विभागाच्या समस्यांबाबत कर्मचार्यांच्या काही तक्रारी होत्या त्यातील ४० कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाबाबत आलेल्या सुचना अवगत करून त्यात सुधारणा करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना स्वच्छता विभागाचे श्री. पाटील यांनी, शहरातील कचरा उठावाबाबत महापालिकेने मोबाईल अॅप तयार केले असून कोणत्या भागातील कचरा दिवसातून किती वेळा उचलायचा, तो उचलल्यानंतर त्याचे फोटो मनपा कर्मचार्याने त्यावर टाकणे बंधनकार करण्यात आल्याचे सांगितले.
यावर शिवसेनच्या पदाधिकारी किशोर घाटगे यांनी, आक्षेप घेत मोबाईल अॅप हा दिखाऊपणा असून नवरात्री होऊन दहा दिवस होवूनही पंचगंगा घाटाची स्वच्छता करण्यात आलेली नाही. नागरिकांनी भंग झालेल्या मुर्त्या रस्त्यावर ठेवून महापालिका प्रशासनाच्या चोख कारभाराचा पर्दाफाश केला आहे. श्री. विशाल देवकुळे यांनी, टाकला खण वेळोवेळी स्वच्छ केली जात नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माजी उपमहापौर उदय पोवार यांनी, एका वॉर्डात एकच कर्मचारी असून, त्याच्याकडे साहित्याची कमतरता असल्याचे सांगितले. यासह श्री. पद्माकर कापसे यांनी, शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिकांना शहरात फिरणे मुश्कील झाले असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. यानंतर माजी उपमहापौर श्री. रविकिरण इंगवले यांनी, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून महापालिका प्रशासनाने सायंकाळ पर्यंत पंचगंगा घाटाची स्वच्छता मोहीम राबवावी अशा सूचना केल्या.
यावर बोलताना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी, आलेल्या सूचनांचा आढावा घेवून लवकरात लवकर त्यावर उपाययोजना करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कचरा उठावाचा प्रश्न गंभीर असून, एकत्रित मोठा कचरा निर्गतीकरणाचा प्रकल्प कार्यान्वित होत नसल्यास तातडीने छोटे छोटे प्रकल्प उभे करून कचरा निर्गतीकरणाचे काम सुरु ठेवावे अशा सूचना केल्या. यासह दवाखान्यामध्ये कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने शासनाकडे पद भरतीची मागणी करावी, त्याचा पाठपुरावा स्वता मी मंत्रालय स्तरावर करेन. त्याचबरोबर शहरातील सेवाभावी डॉक्टराना या रुग्णालयात सेवा देण्याबाबत महापालिकेने आवाहन करावे, अशा सूचनाही मांडल्या.
या बैठकीस महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, उदय पोवार, दीपक गौड, जयवंत हारुगले, रमेश खाडे, फेरीवाले सेनेचे धनाजी दळवी, तुकाराम साळोखे, अजित गायकवाड, अनिल पाटील, रघुनाथ टिपुगडे, राजू पाटील, राहुल चव्हाण, विशाल देवकुळे, अश्विन शेळके, निलेश हंकारे, मंदार तपकिरे, गजानन भुर्के, राजू काझी, पियुष चव्हाण, अविनाश कामते, ओंकार परमणे, कपिल सरनाईक, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
    रूूूू

आप्रसिद्धी प्रमुख, शिवसेना शहर कार्यालय,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!