
कोल्हापूर: फोडाफोडी करून हिंसक आंदोलन करण्यापेक्षा आणि ऊस दराचा प्रश्न चिघळण्यापेक्षा शांततेने आवाहन करून लोक तुमचं किती ऐकतात हे दाखवून द्यावे असा इशारा चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांना दिला आहे. नुकताच खासदार राजू शेट्टी यांनी चंद्रकांतदादांनी हातकलंगडे मतदारसंघात निवडणुकीला उभे राहून किती लोक तुमच्यामागे आहेत हे पाहावे असे आव्हान दिले होते. याला आज चंद्रकांतदादा यांनी कोल्हापुरात त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. मला आव्हान देण्यापेक्षा शांततेने आंदोलन करून तुमच्या मागे किती लोक उभे राहतात व तुमचं लोक किती ऐकतात हे पाहावे असा टोलाही त्यांनी लगावला. ऊस दराबाबत प्रश्न न चिघळवता उद्या पासुन कोल्हापुरचे कारखाने सुरू व्हावेत. राजू शेट्टी आणि कारखानदार यांनी बसून तोडगा काढावा आणि लवकरात लवकर प्रश्न निकाली काढावा. याबाबत जर काही अडचण असल्यास सरकार मदत करेल. मागील वर्षीही मी मध्यस्थी केली होती, असेही चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. सरकारने साखर निर्यातीला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. मिठाई शीतपेय याला जादा दराने साखर देण्यासाठी केंद्र सरकार यावर विचार करत आहे. सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेले आहे. दुष्काळग्रस्त भागातही सरकारने शेतसारा माफ केला आहे. तरी खासदार राजू शेट्टी यांनी शांततेनेच आंदोलन करून दाखवावे असे आव्हान आज चंद्रकांतदादांनी शेट्टी यांना दिले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांबाबत प्रश्न उपस्थित केला असता 15 डिसेंबर नंतर यावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसला लांब ठेवायचे असेल तर शिवसेना व भाजप युती केल्याशिवाय पर्याय नाही असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 42 जागांवरती विचार झाला आहे. सहा जागांबाबत युती करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे विधानसभेसाठी तोच फॉर्म्युला वापरण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply