हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना आमदारांची निदर्शने

 

मुंबई  : मराठा समाजाला आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात मराठा क्रांती मूक मोर्चा लाखोंच्या संखेने पार पडले आहेत. या मोर्चाना सुमारे दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही मराठा समाजाला आजतागायत आरक्षण मिळालेले नाही. मराठा समाज आरक्षणाच्या बेडीत गेली अनेक कित्तेक वर्षे अडकून पडला आहे. मराठा समाजाच्या प्रगती करिता मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी करीत आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यसह शिवसेना आमदारांनी विधानसभा सभागृहाच्या प्रवेशद्वारा जवळ निदर्शने केली.

                सभागृहाच्या प्रवेशद्वारा जवळ सकाळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिनचेकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सत्यजित पाटील यांनी “मराठा समाजास आरक्षण देण्यास दिरंगाई व टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ निदर्शने केली. “देशात नांदतात अनेक जाती, शासनाची मात्र मराठा आरक्षणाला आडकाठी” अशा आशयाच्या फलकासह “एक मराठा एक लाख मराठा”, “मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे” “मराठा समाजाचा मागणीचा केला फुटबॉल” अशा घोषणा देत प्रवेश करून मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, मराठी समाज गेली कित्तेक वर्षे आरक्षणाच्या बेडीत अडकला आहे. मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर लाखोंचे मूक मोर्चे निघाले, त्यानंतर मराठा समाजाने ठोक मोर्चाही काढला, याकडे राज्य शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. आरक्षणामुळे मराठा समाजावर अन्याय होत असून, सर्वच क्षेत्रात मराठा समाजाची पिचेहाट झाली आहे. आरक्षणामुळे शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा समाजातील मुलाना गुणवत्ता असूनही त्याना प्रवेश मिळत नाही, लाखो रुपयांची फी भरावी लागत आहे. त्याचमुळे मराठा समाज विकासापासून वंचित राहिला आहे. मराठा आरक्षणावर आजपर्यंत फक्त चर्चाच करण्यात आली आहे, प्रत्यक्षात कोणतीच कृती होताना दिसत नाही आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत असून, शासन यावर ठोस उपाययोजना करीत नाही. मागासवर्गीय आयोगाचे आणि न्यायालयाचे कारण सांगून सरकारने मराठा समाजाच्या मागणीचा फुटबॉल केला आहे. त्यामुळे तातडीने शासनाने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे, अन्यथा शासनाने जाहीर केलेल्या १ डिसेंबर तारखेनंतर मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशाराही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!