आमदार मुश्रीफ यांचे कागलसह चंदगडच्या खराब रस्त्यांप्रश्नी आंदोलन

 

मुंबई, :आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. या दोन्ही मतदारसंघात विरोधी आमदार असल्यामुळेच सरकारने निधी देण्यात दुजाभाव केला आहे .त्यामुळेच रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा आरोपही , श्री . मुश्रीफ यांनी यावेळी केला. यावेळी ”विकासकामांना निधी न देणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो”, तसेच “राज्यातील रस्त्यांची वाट लावणार्‍या सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा धिक्कार असो “ अशा निषेधाच्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी श्री .मुश्रीफ व आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी कागल व चंदगड मतदार संघातील खड्ड्यांचे छायाचित्र असलेला फलक हाती धरला होता. त्यावर “खड्डेच खड्डे चोहीकडे मग रस्ते गेली कुणीकडे “? अशा आव्हानात्मक सवालाची विचारणा केली होती. हे रस्त्यातील खड्डे नव्हेत तर हे आहेत खड्ड्यातील रस्ते , असा उपरोधात्मक निषेधही फलकावर नोंदवलेला होता.

यावेळी बोलताना आमदार श्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या साडेचार वर्षात युतीचे शासन आल्यापासून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या रस्त्यांची पुरती वाट लावली आहे. कागल , चंदगड विधानसभा मतदारसंघासह एकूणच राज्यात रस्त्यांची फारच वाईट दुर्दशा झाली आहे. त्यामुळेच हजारो जीवांचे रस्ते अपघातात हकनाक बळी गेले; तर काहींना आजीवन अपंगत्व आले आहे. तरीही सरकार जनतेच्या जीवाशी राजरोस खेळतच आहे.

चौकट:
हा तर सर्वात मोठा विनोद……….
श्री. मुश्रीफ म्हणाले गेल्या साडेचार वर्षात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या रस्त्यांसाठी निधी न देता रस्त्यांची पुरती वाट लावली आहे. या सरकारचे शेवटचे अगदी सहाच महिने उरले आहेत तरीसुद्धा श्री पाटील सांगत आहेत, “ घणाचे घाव घातले तरी फुटणार नाहीत असे रस्ते करू”. हा गेल्या पाच वर्षातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा विनोदच मानावा लागेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!