

‘श्री सिद्धी गणेश फिल्म्स’प्रस्तुत ‘घर होतं मेणाचं’ या चित्रपटाची निर्मिती ज्ञानेश्वर ढोके आणि नितीन ज्ञानदेव शेटे यांनी केली आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी एका नव्या विषयाला चालना दिली असून राजेश द. चव्हाण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शनाबरोबरच राजेश चव्हाण यांनी या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत. यापूर्वा राजेश चव्हाण यांनी असेच संवेदनशील विषय हाताळून आपल्या सर्जनशील दिग्दर्शनाची जाणीव करून दिलेली आहे. चित्रपटाची नायिका वसुंधरा असून ती विवाहित आहे. पती सतत नाटयप्रयोगात व्यक्त असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडलेली आहे. कुटुंबाच्या सुखासाठी धडपड करीत असताना तिचे स्वतःचे वैयक्तिक जीवन उद्धवस्त झालेले आहे. कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी ती घराबाहेर पडते. ज्या स्त्रीबरोबर ओळख होते तिच्यामध्ये वसुंधरासुद्धा भरकटली जाते. पुरूषांच्या मनमानी व्यवहाराला वेळीच उत्तर द्यायला हवे. तिचे व्यक्त होणे म्हणजेच ‘मी टू… मी सुद्धा’ असे तिचे सांगणे घर होतं मेणाचं या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
वसुंधराची मुख्य व्यक्तिरेखा अलका कुबल-आठल्ये यांनी केलेली आहे. आजवरच्या शोषित, कौटुंबिक नात्यापेक्षा ही थोडी वेगळी भूमिका आहे ज्यात अलका कुबल-आठल्ये यांचे वेगळे रूप पहायला मिळणार आहे. ग्राफिक तंत्राचा चित्रपटांच्या नामावलीत आजवर ब-याचवेळा वापर केलेला आहे. इथे मात्र चित्रपटातील नायिका आवश्यक तिथे ग्राफिकच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. चित्रकथा या संकल्पनेतून हा चित्रपट हाताळला गेलेला आहे. ग्राफिक व अॅनिमेशनची कामगिरी योगेश गोलटकर याने केलेली आहे. छायांकन समीर आठल्ये यांचे असून संकलनाची जबाबदारी कुणाल प्रभू यांनी पार पाडली आहे. मराठी विश्वातील दोन दिग्गजांच्या वैविध्यपूर्ण काव्य मैफिलीचा अनुभव प्रेक्षकांना अनेक वर्षांच्या कालावधीनंतर घ्यायला मिळणार आहे. आरती प्रभू यांचे काव्य आणि अशोक पत्की यांचे संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. अलका कुबल-आठल्ये यांच्यासोबत मोहन जोशी, अविनाश नारकर, पल्लवी सुभाष, आशालता वाबगावकर, रविंद्र बेर्डे, शितल शुक्ल, सिद्धार्थ जाधव यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 7 डिसेंबरला ‘घर होतं मेणाचं’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
Leave a Reply