
कोल्हापूर: राष्ट्रीय विचारांच्या प्रसारासाठी लोक उत्कर्ष समितीच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. के.ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.’ हिंदू व्यासपीठ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या व्याख्यानमालेचे हे तेविसावे वर्ष आहे. गुढीपाडवा हा हेडगेवार यांचा जन्मदिवस असतो. यानिमित्ताने दरवर्षी पाडव्याचा मुहूर्त साधून या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या वर्षी ७ ते ९ एप्रिल या दरम्यान ही व्याख्यानमाला होणार आहे, अशी माहिती कार्यवाह उदय सांगवडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तीन दिवसांच्या या व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे ‘राजकीय क्षितिज’ या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी नक्षलवाद अभ्यासक कॅप्टन स्मिता गायकवाड या ‘शहरी नक्षलवाद’ यावर मार्गदर्शन करतील. तसेच तिसऱ्या दिवशी शिवाजी बुवा मोरे जे संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. ते ‘संत परंपरा आणि पर्यावरण रक्षक’ यावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्या-त्या वर्षी देशातील निर्माण होणारी परिस्थिती व त्याला अनुषंगिक विषयांची निवड करून त्यातील तज्ञ, अभ्यासक व्याख्यानमालेसाठी बोलवले जातात असे अनिरुद्ध कोल्हापुरे यांनी सांगितले. तीनही दिवशी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेसहा वाजता ही व्याख्याने होणार आहेत. तरी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेस सदानंद राजवर्धन, दिलीप मैत्राणी उपस्थित होते.
Leave a Reply