

राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे अरुण डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने तालुका दूध संस्था प्रतिनिधींचा मेळावा आयोजित केला होता. खासदार धनंजय महाडिक यांना एकमुखी पाठिंबा व्यक्त करून, या मेळाव्यातील दुध संस्था प्रतिनिधींनी, प्रत्येक गावात धनंजय महाडिक यांच्या कामाची माहिती पोचल्याचे सांगितले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कृष्णराव किरुळकर होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत भोगावतीचे माजी अध्यक्ष संजय पाटील यांनी केले. प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किसन चौगुले म्हणाले, २०१४च्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना राधानगरी तालुक्याने मताधिक्य दिले होते. त्याची पुनरावृत्ती याही वेळी केली जाईल. धनंजय महाडिक यांनी खासदार म्हणून अभिमान वाटेल, असे काम करून दाखवले. त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया असे आवाहन चौगले यांनी केले. यावेळी गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, शेतकरी संघटनेचे रावसाहेब डोंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील म्हणाले, केंद्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी, खासदार महाडिक यांना पुन्हा दिल्लीत पाठवूया. तर भोगावती कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील म्हणाले, अरुंधती महाडिक आणि धनंजय महाडिक या दांपत्यानेे, सामाजिक बांधिलकी मानून सातत्याने काम केले आहे. त्यांचे सामाजिक योगदान जनता विसरणार नाही. त्यामुळेच परतफेड म्हणून मतांच्या स्वरूपात धनंजय महाडिक यांना जनतेचा आशिर्वाद मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनी बोलताना, खासदार धनंजय महाडिक यांचे गेल्या पाच वर्षातील काम अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी असल्याचे सांगितले. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला दिशा दिली. त्यांच्या विचाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार महाडिक कार्यरत आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनता सक्रीय खासदारांच्या सोबत असल्याचे डोंगळे म्हणाले. खासदार महाडिक म्हणाले, राधानगरी तालुका ही महाडिक कुटुंबीयांची कर्मभूमी आहे. गेल्या निवडणुकीत मला मतदारांनी ज्या अपेक्षेने दिल्लीला पाठवले होते, ती अपेक्षा मी पूर्ण केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर मी गेल्या पाच वर्षात संसदेत आवाज उठवला. काही प्रश्न सुटण्यासाठी कायदा बदलण्यास सरकारला भाग पाडले. भविष्यात शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमाफी साठी संसदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी मतदारांनी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. दूध संस्था प्रतिनिधींंच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, संजयसिंह पाटील, संचालक ए डी चौगुले, धीरज डोंगळे, सुशील पाटील कौलवकर, सभापती दिलीप कांबळे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, ज्येष्ठ संचालक पी डी धुंदरे, माजी संचालक अविनाश पाटील, पांडुरंग डोंगळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि दूध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
Leave a Reply