
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 15 तर हातकणंगले मध्ये 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कोल्हापूर मतदार संघातील 4 आणि हातकणंगले मतदान संघातून 3 उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच आज उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.
अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्याचप्रमाणे उमेदवारांना आचारसंहिता, मतदान केंद्रावरील व्ही व्ही पॅड वाटप, निवडणूक तयारी, याची माहितीही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक खर्च संबंधित सर्व नोंदी उमेदवारांनी कशाप्रकारे ठेवल्या पाहिजेत याचे मार्गदर्शन उमेदवारांना केले. दहा-पंधरा आणि एकोणीस एप्रिल रोजी संपूर्ण खर्चाची तपासणी करण्यात येणार आहे.आचार संहितेचे पालन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच जात-धर्म याबाबत आक्षेपार्ह प्रचार करायचा नाही जर तशा प्रकारची तक्रार आली तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. त्याच प्रमाणे पदयात्रा, लाऊडस्पीकर, सभा यांची परवानगी घेऊनच करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यासाठी “वरी लिस्ट” नावाची एक अद्ययावत यंत्रणा उमेदवारांसाठी ठेवण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूक निरीक्षकांकडून उमेदवारांना येणाऱ्या समस्यांचे निरसन केले जाणार आहे. तसेच उमेदवारांचे प्रबोधनही केले जाणार आहे. सैन्यातील लोकांना पोस्टल बॅलेट पेपर पाठवण्याचे काम सुरू झाले आहे. दहा लाखाच्या वर जर रक्कम सापडली तर आयकर विभागाची त्वरित कारवाई होणार आहे. 14 चेक पोस्ट नाक्यावरती सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. एकूणच निवडणूक यशस्वीपणे पार पडण्यासाठी शासन यंत्रणा सज्ज आहे असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
Leave a Reply