
कोल्हापूर: जेव्हा देशाच्या सुरक्षेचा किंवा देशातील जनतेचा प्रश्न असतो तिथे राजकारण करता येत नाही. परंतु आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही गोष्टीवर राजकारण करून काहीही बोलत असतात, अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. दिलेली आश्वासने न पाळणे आणि प्रत्येक गोष्टीचे खापर इतरांवर फोडणे हा त्यांचा स्वभावधर्मच झालेला आहे. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवून आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्ती का झाली नाही? असा प्रश्न लोकांनी विचारू नये म्हणून ते लोक देशातील जनतेची सतत दिशाभूल करत असतात. गेल्या पाच वर्षात याची अनेक उदाहरणे आहेत. सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कामात हस्तक्षेप होत आहे अशी तक्रार केली. हे देशाच्या इतिहासात प्रथमच घडले. मोदींच्या कालखंडात आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नेमणुकीनंतर सहा महिन्यात राजीनामा देऊन ते निघून गेले. हेही दैनंदिन हस्तक्षेपामुळेच घडले असे त्यांचे जवळचे लोक सांगतात. भारतीय सेनेने शौर्य दाखवले. त्याचे अभिनंदन पंतप्रधान यांनी केले. आणि मोदी सेना असा उल्लेख केला याबद्दल आक्षेप म्हणून राष्ट्रपतींना हे पत्र लष्करप्रमुखांनी लिहिले आहे. सैन्याच्या शौर्याचा राजकारणासाठी असाही फायदा नरेंद्र मोदी यांनी घेतला. एकूणच लष्कर, रिझर्व बँक, न्यायालय अशा संस्थांवर हल्ला होत आहे. यांचा वापर राजकारणासाठी होत आहे. हे देशाच्या संसद व व संविधानाला घातक आहे. ही घातक प्रवृत्ती घालवली पाहिजे असे आवाहनही पवार यांनी देशवासीयांना केले.
जम्मू-काश्मीर आणि भारत असे दोन पंतप्रधान पवारांना पाहिजे आहेत काय? असा सवाल करत नरेंद्र मोदी यांनी पवारांवर टीका केली होती. परंतु मोदीं गफलत करतात. याचे उत्तर त्यांनी स्वतः देणे अपेक्षित आहे.लोक आता त्यांच्या विरोधात जात आहेत म्हणून जनमतासाठी ते कोणत्याही पातळीवर जाऊन टीका करत आहेत. राफेल प्रकरणीही विरोधकांना त्यांनी विश्वासात न घेता गोपनीयतेचे कारण सांगून स्वतः सर्व कारभार केला. आणि आता कागदपत्रे चोरीला गेली म्हणून सांगितले आहे. काही वृत्तपत्रांनी ह्याच्यावरती टीकेची झोड उठवली. परंतु वृत्तपत्रस्वातंत्र्य यावरही हे भाजप सरकार गदा आणण्याचे काम करत आहे. मोदी नेहमीच संभ्रम निर्माण करतात. त्यांची मते ही सतत बदलत असतात. त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नका असे पवार म्हणाले.
2014 सालच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला होता. या संधीचे सोने त्यांना करता आलं नाही. आता हिंदू आणि पूलवामा समोर आणून ते लोकांची सहानुभूती मिळवत आहेत. मोदी आणि शहा हे देशाला घातक आहेत. हे सांगण्यासाठी राज ठाकरे आज संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेत आहेत. याचा परिणाम विरोधासाठी नक्कीच होईल. लोक बदल करण्याच्या मनस्थितीत आहेत. सेना-भाजपचे सरकार त्यांना नको आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यमध्ये सातत्य असायचे. पण आज शिवसेनेचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते हवामान बदलल्या प्रमाणे आपली मते बदलत असतात. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे काही नेते भाजप सरकारला मदत करत आहेत. यावर बोलताना पवार म्हणाले “आम्ही पुढील निवडणुकीच्या काळात हे लक्षात ठेवू तसेच जनता दल आमच्यासोबत आहे.पश्चिम महाराष्ट्रात आघाडीच येणार असे पवार यांनी सांगितले.
Leave a Reply