
कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच सुडाचे राजकारण करतात. लोक सुडाच्या या राजकारणाला कधीच बळी पडत नाहीत. आजपर्यंत मोदींनी अनेक आश्वासने दिली. पण ती पूर्ण केली नाहीत.नेहरूंपासून यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत विरोधकांना सन्मान करायची भूमिका घेण्याची पद्धत आहे. पण भाजप सरकारने सत्तेवर आल्यापासून विरोधकांवर सतत कारवाई व धाडसत्र सुरू केले आहे. भारत हा लोकशाही जतन करणारा देश आहे. अशा देशाचे संरक्षण मोदींकडून होणार नाही. देशासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्यांचा विसर मोदींना पडला आहे. अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय महाडिक तसेच हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ गांधी मैदान येथे काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी,स्वाभिमानी शेतकरी संघटना, कवाळे गट, शेतकरी कामगार पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आर पी आय, दलित महासंघ आणि मित्र पक्ष यांच्यावतीने भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये पवार यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
56 इंचाची छाती असणार्या मोदींनी सांगावं की, गेल्या तीन वर्षापासून कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्याला त्यांनी का नाही सोडवले? सैन्यदलावर हल्ला झाला. त्यानंतर पुन्हा प्रतिहल्ला केला. याचे श्रेयही मोदी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी घेतात. मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे असे म्हणणारे यांनी सांगाव की स्पोटक आली कुठून? स्वतःला चौकीदार म्हणतात पण आम्हाला चौकीदार व्हायचे नसून आमच्या तरुण पिढीला मालक बनायचे आहे. मोदींनी पंतप्रधान व्हावं म्हणून इथे ज्यांचे काही कर्तृत्व नाही अश्या कुणालाही मत आम्ही कसे काय देणार?
आघाडी सरकारच्या काळात शेतकर्यांचे 70 हजार कोटींचे कर्ज माफ केलं गेलं. शेतकरी जगला तरच देश टिकतो. परंतु मोदी पंतप्रधान झाल्यापासून बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. एकूण सर्वच पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला.
कोल्हापुरी चप्पल आणि सोलापुरी चादर जगभरात नेणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये त्यांच्या कोल्हापुरात झालेल्या सभेत दिले होते. परंतु हे आश्वासन पोकळ ठरत सोलापुरी चादरी जीएसटीचा विळख्यात अडकलेल्या आहेत. छत्तीस उद्योगपती देश सोडून पळून गेले.अमित शहा म्हणतात “शेतकऱ्यांचे कर्ज माफीची भूमिका कधीच घेतली नव्हती. याउलट मोदींनी 2014 ला किसानांना कर्जमाफी दिली जाईल अशी भूमिका स्पष्ट केली होती. आश्वासन न पाळणे हा युतीचा धर्म आहे. यांच्यामध्ये सुसंगतता नाही. त्यामुळे हे लोकांना कसा काय विश्वास देणार? असे काँग्रेसचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी विचारणा केली. तसेच चित्रफितीद्वारे नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अमित शहा,उद्धव ठाकरे यांनी काय वक्तव्य केली होती याचे सादरीकरण करण्यात आले.
शिवाजी पुलाचा प्रश्न कायदा बदलून मार्गी लावला. ई एस आय हॉस्पिटल, पासपोर्ट केंद्र, विमानतळ, रेल्वे स्थानक सुशोभीकरण, वैभववाडी कोल्हापूर मार्ग मंजुरी अशी अनेक कामे पूर्ण करत आठ हजार कोटी रुपयांचा निधी कोल्हापूरसाठी आणला.यासाठीच संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि कोल्हापूरचा झेंडा दिल्लीत फडकला.टीका करण्यापेक्षा आमचं काम बघा.असे धनंजय महाडिक यांनी सांगितले. अजूनही अनेक प्रश्न सोडवायचे आहेत.जेणेकरून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होईल. शेतकरी, शिक्षक यांना पेन्शन, प्रत्येक समाजासाठी कार्य करायचे आहे. असा जाहीरनामा ही महाडिक यांनी सादर केला.
गेल्या पाच वर्षात मोदींची लाट असतानाही महाडिक यांना खासदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने निवडून दिले. उत्कृष्ट कामामुळे त्यांना पुन्हा संधी दिली पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि 72 हजार रुपये वार्षिक आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर देणार असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. आत्ताचे सरकार हे शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. उलट कोणत्याही गोष्टीचे भांडवल करून मतं मिळवण्यासाठी पुढे आहे. एकीकडे पाकिस्तानवर दहशतवादी हल्ला करतात. आणि दुसरीकडे पाकिस्तानात बिर्याणी खाऊन येतात. इम्रान खानला शुभेच्छा देतात. त्यांच्याशी यांचं काय साटेलोटे आहे? पाकिस्तानकडून साखर, कांदा आयात का केली जाते? या प्रश्नांची उत्तरं मोदींनी द्यावीत अशी विचारणा हसन मुश्रीफ यांनी केली. शिवसेनेने नेहमी भाजपवर टीका केली आहे आणि आता ते सत्तेसाठी एकमेकांजवळ आले आहेत असे मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी जयवंतराव आवळे, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे,आमदार संध्यादेवी कुपेकर, ए वाय पाटील,के पी पाटील,प्रल्हाद चव्हाण, पी एन पाटील,महापौर सरिता मोरे,आर. के पोवार,अरुंधती महाडिक, व्ही. बी. पाटील,गोकुळ चे संचालक उपस्थित होते.
Leave a Reply