मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात मोबाईल घेवून जाण्यास मनाई: जिल्हाधिकारी

 

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होत असून मतदानादिवशी मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात मोबाईल घेवून जाण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली असून मतदान केंद्रात मोबाईल घेवून गेल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी आज येथे बोलताना दिला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्रीमती अलका श्रीवास्तव, तरुण राठी, शैलेश बन्सल आणि दिपक कुमार यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आणि श्रीनिवास घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक निर्णय अधिकारी तसेच नोडल अधिकारी, विविध पथक प्रमुख उपस्थित होते.
निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची अंतिम तयार पूर्ण झाली असून मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुलभपणे पार पडावी यादृष्टीने सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन आपआपल्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडाव्यात, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई म्हणाले, मतदारांना त्यांचे नाव व मतदान केंद्र असलेली व्होटर स्लिप उद्यापर्यंत घरपोच व्हावी, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात मोबाईल घेवून जाण्यास प्रतिबंध केला असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत प्राधिकारपत्राशिवाय कोणालाही मतदान केंद्र परिसरात फोटो अथवा चित्रिकरण करता येणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. याबरोबरच विधानसभा मतदार संघातील किमान एक मतदान केंद्र मॉडेल मतदान केंद्र तसेच म्हणून विकसित करावे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
निवडणुकीच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या सर्वच पथकांनी आपआपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, यामध्ये कसल्याही प्रकारची कसुर होता कामा नये, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रामध्ये दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, मेडीकल किट, स्वयंसेवक, आशा, पाळनाघर, अशा आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून यावर अधिक लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी रांगेत थांबून राहायला लागू नये, याची काळजी घ्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 23 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये दिव्यांग मतदारांचे 100 टक्के मतदान कसे होईल, या दृष्टीने आवश्यकते प्रयत्न आणि उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!