
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उच्च विभूषित उमेदवार डॉ. अरुणा माळी यांना ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला असून ओबीसी चळवळीचा आवाज दिल्लीत पोहोचवण्यासाठी संघर्षशील व झुंजार असलेल्या डॉ. अरुणा माळी यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष समितीचे महासचिव प्राध्यापक श्रावण देवरे यांनी आज केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
52 टक्के ओबीसींच्या निर्णायक मतांवर निवडून येणाऱ्या भाजप-सेना व काँग्रेस राष्ट्रवादी या चारही पक्षांनी संगनमताने षडयंत्र करून मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण दिले आहे. धोबी, लोहार, सुतार नाभिक, कुंभार, अन्सारी पिंजारी यासारख्या बलुतेदार विश्वकर्मा जाती व वंजारा, वडार, पाथरवट, धनगर यासारख्या भटक्या जमातींना म्हणजे खऱ्या ओबीसींना देशोधडीला लावण्याचे काम सरकारने केले आहे.
13 पॉईंट रोस्टर च्या माध्यमातून दलित-आदिवासींचे आरक्षण नष्ट करण्यात आले. दहा लाख आदिवासींना जंगलातून हद्दपार करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. ऍट्रॉसिटीचा कायदा शिथिल करणे, गो रक्षकांकडून मुसलमानांना होणारी मारहाण असे असंख्य अन्याय व अत्याचार होत असताना जागृत बहुजनांनी आता वंचितांचे सरकार आणण्यासाठी चंग बांधला पाहिजे. या चारही पक्षांतर्फे कोणीही निवडणुकीला उभे असेल तर त्यांना मतदान करू नका. यापैकी एक तर हे मराठा आहेत किंवा ब्राह्मण आहेत. 29 नोव्हेंबर 2018 रोजी सर्व पक्षातील ओबीसी आमदारांनी आपल्या मराठा ब्राह्मण मालकांच्या आदेशाप्रमाणे मराठा आरक्षण बिलाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे आताही तुम्ही जर या चार पक्षांचे खासदार निवडून दिलेत तर ते उद्याच्या लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या जाट- पटेल- मराठा आरक्षण बिलाच्या बाजूने मतदान करतील. याचीच पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे. राज्यातील ओबीसी आरक्षण तर गेलेच आहे. उद्या देशपातळीवरचे ओबीसी आरक्षण सुद्धा कमी होईल. या देशाचा 52 टक्के ओबीसी वाचवायचा असेल तर या चारही पक्षांना मतदान करू नका असे आवाहनही आज ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले.
Leave a Reply