
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र व संवादशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख व ग.गो.जाधव अध्यासन केंद्राचे प्रमुख रत्नाकर पंडित यांना साप्ताहिक मावळ मराठाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दैनिक क्रांतिसिंहच्या संपादिका सुनंदा मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूर प्रेस क्लब येथील दालनात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. दरवर्षी साप्ताहिक मावळ मराठा च्या वर्धापन दिनानिमित्त व्यंगचित्रकार, संपादक, जाहिरात संस्थेचे प्रतिनिधी, पत्रकार व या संबंधित या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. रत्नाकर पंडित यांनी आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे शिक्षण दिले आणि या क्षेत्रात पत्रकार म्हणून घडवले. त्यांच्या कर्तुत्वाला सलाम म्हणून यंदाचा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. असे साप्ताहिक मावळ मराठा चे संपादक सदानंद खोपकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली.
गेली चाळीस वर्षे पत्रकार क्षेत्रात काम करत आहे. या क्षेत्रात महिला म्हणून आलेले तसेच एखादे दैनिक चालवण्यासाठी आणि ते स्पर्धेत टिकवण्यासाठी आलेले अनुभव क्रांतिसिंहच्या संपादिका सुनंदा मोरे यांनी सांगितले. वृत्तपत्रांमध्ये विचार हा महत्त्वाचा असतो असेही त्या म्हणाल्या.
कोल्हापुरातील प्रेस क्लबमध्ये हा पुरस्कार सोहळा होत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रत्नाकर पंडित यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा सत्कार आमच्या कृतज्ञतेचा विषय आहे अश्या भावना कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केल्या. वृत्तपत्र हे छोटे असो अगर मोठे ते निकोपपणे चालवणे गरजेचे असते. हे वृत्तपत्र स्पर्धेत टिकण्यासाठी खूप अडचणी येतात. परंतु एका विचाराने जाणारे लोक आज संघर्षातून समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत. या प्रवाहातून आज मी बाजूला जाऊन पत्रकार घडवण्याचे काम करत आहे. विभागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना समाजात चांगले पत्रकार घडवण्याचे काम सचोटीने केले म्हणूनच हा माझा सन्मान होत आहे, असे सत्काराला उत्तर देताना रत्नाकर पंडित यांनी सांगितले. यावेळी सदानंद खोपकर लिखित राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, शिवाजी जाधव, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, शैलेंद्रा खोपकर, सीमंतिनी खोपकर यांच्यासह सर्व प्रसारमाध्यमातील पत्रकार छायाचित्रकार उपस्थित होते.
Leave a Reply