कोल्हापूर मतदार संघात सरासरी 70 टक्के  मतदान;  चुरशीने मतदान; महाडिक व मंडलिक यांचे भवितव्य मतपेटीत बंद

 

कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी  सात वाजता सुरुवात झाली.देशात 117 तर महाराष्ट्रात चौदा मतदान संघात आज मतदान पार पडले. यामध्ये कोल्हापूर या 47 क्रमांकातील मतदार संघात 70 टक्के असे चुरशीने मतदान झाले. महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे भवितव्य आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानातील मतपेटीत बंद झाले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.10%  मतदान झाले. सर्वाधिक मतदानाचा वेग कोल्हापूर शहरात दिसून आला. शहरात 16% मतदान झाले. सकाळी 11 वाजेपर्यंत 25.49% मतदान झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील महात्मा गांधी कन्या विद्यामंदिरात तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले. 56 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे केंद्रावर गुलाब पुष्प देऊन प्रशासनाने स्वागत केले.

उन्हाचा तडाखा इतका असतानाही महिला वर्गात मतदानाबद्दलची जागृती यावेळी दिसून आली. भर उन्हातही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लांबच लांब रांगा होत्या.दुपारी 3 वाजेपर्यंत कोल्हापूर मतदार संघात 42%  मतदानाची नोंद झाली. दुपारी गरम हवामानामुळे शहरातील 38 ठिकाणी ईव्हीएम मशिन्स बंद पडली.त्यामुळे काही काळ मतदान यंत्रणा थांबली होती. दुपारी 3 ते 6 यावेळेस मतदान केंद्रावर गर्दी होऊ लागली. कोल्हापूर मध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54% मतदान नोंदवण्यात आले.तर 6 वाजेपर्यंत 65% मतदानाची नोंद करण्यात आली. 6 वाजले तरी मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा होत्या.एकूणच कोल्हापूर मतदान संघात चुरशीने 70 टक्के मतदान झाले.2014 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर येथे 72 टक्के मतदान झाले होते. यावेळी 2 टक्क्यांनी मतदानाचा आकडा घसरला असल्याचे दिसून येते. ईव्हीएम मशिन्स बंद पडली या व्यतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान शांततेत पार पडले. एकूण झालेल्या मदतानाची अद्यावत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून उपलब्ध झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!