
कोल्हापूर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 6 मे ते 19 मे या कालावधीत प्रत्यक्ष रुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार असून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन हे रुग्ण शोधून उपचार केले जाणार आहेत भारतात क्षयरोग एक प्रमुख समस्या असून दररोज अंदाजे सहा हजार व्यक्तींना क्षयरोग होतो तसेच दर तीन मिनिटाला दोन मृत्यू होतो यामुळे शासन स्तरावर सन2030 पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करण्याचे लक्ष ठेवले असून 2025 पर्यंत भारत शयरोग मुक्त करण्याची घोषणा केली असून या मोहीमेचे उद्घाटन जिल्हास्तरावर बीड ता. करवीर येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी.कुंभार यांनी दिली. या मोहिमेचा निरोगी अरोग्यासाठी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सामाजिक आरोग्य समस्या असून देशात दररोज अंदाजे 6 हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोग होतो. जागतिक आरोग्य संघटनेने सन2030 पर्यत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर शासनस्तरावर सन 2025 पर्यत ’ भारत क्षयरोग मुक्त’ करण्याची घोषणा केलेली आहे.
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सन 2003 पासून भारतभर राबविण्यात येतो. मागील काही काळापासून कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होण्याचे प्रमाण स्थिर किंबहुना कमी होत आहे. फुफुसाचा क्षयरोग असणारे बरेचसे रुग्ण, होणा-या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व त्याबाबत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले आहे. वरील वस्तुस्थिती पाहता केंद्रशासनातर्फे अदयापही क्षयरोग निदानापासून वंचित असणा̠या क्षयरुग्णांना गृहभेटीव्दारे शोधून काढण्यासाठी क्षयरुग्णशोध मोहीम राज्यामध्ये राबविण्याचे ठरविलेले आहे. 2019 मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दि. 6 मे 2019 ते 19 मे 2019 या दरम्यान सदर मोहीम राबविण्यात येणार आहे. क्षयरोगाचे निदान होण्यापासून अदयापही वंचित असणा-या सर्व क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचारावर आणणे हा सदर मोहीमेचा मुख्य उद्देश आहे.
क्षयरुग्ण शोधण्याचे प्रमाण वाढविणे, समाजामध्ये क्षयरोगाबददल जनजागृती करणे शास्त्रोक्त माहिती लोकांपर्यंत पोहचविणे व क्षयरोगाचे लवकर निदान करणे व रुग्णांना लवकरात लवकर उपचारावर घेणे, ही या मोहीमेची ध्येये आहेत. या मोहीमेतंर्गत जोखमीच्या भागांमध्ये जसे झोपडपट्टी, स्थलांतरीत वस्त्या, औदयोगिक कामगार,असंघटित कामगार,वीट भट्टी कामगार, दगड फोडणारे कामगार, खाणीतील कामगार वसाहती इत्यादी ठिकाणासहित पोहचण्यासाठी अवघड, दुर्गम भागामध्ये आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, ए.एन.एम.,एम.पी.डब्लु.,आशा कार्यकर्ती प्रत्यक्ष जाऊन घरोघरी भेट देऊन संशयित क्षयरुग्णांची तपासणी करणार आहेत. लक्षणे सापडल्यास जरूर त्या चाचण्या मोफत करवुन घेणार आहेत. निदान झाल्यास मोफत औषधोपचार त्वरित सुरु करतील. तसेच त्या क्षयरुग्णास थेट त्याच्या बँक खात्यामध्ये दरमहा ५०० रुपये पोषण आहार करिता औषधे संपेपर्यंत जमा केले जातील. याकरीता कोल्हापूर जिल्हयातील प्रामुख्याने 12 तालुक्यांतर्गत जोखीमीची कार्यक्षेत्रांची एकुन 3,55,538 लोकसंख्येची निवड करण्यात आलेली आहे. सदर मोहीमेंसाठी एकुण 302 कर्मचारी पथके काम करणार आहेत. ऑटोरिक्षा व्दारे माइकिंग,पोस्टर, बॅनर, माहिती पत्रके,पथनाटय,आकाशवाणीवरील मुलाखती द्वारे या मोहिमेचे जनजागरण करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हयात ग्रामीण भागामध्ये 2018 मध्ये एकुण 2614 इतके नवीन क्षयरुग्ण आढळले. त्यापैकी 481 खाजगी वैद्यकिय व्यवसाईकाककडे तर सरकारी केंद्राकडे2133 इतके क्षयरुरुग्णांनी उपचार घेतला आहे. तसेच जानेवारी ते मार्च 2019 पर्यत एकुण 645 इतके क्षयरुग्ण आढळले त्यापैकी 119 खाजगी वैद्यकिय व्यवसाईक कडे तर526 रुग्ण सरकारी केंद्रांकडून उपचार घेत आहेत. कोल्हापूर जिल्हयात आज अखेर एकुण 374 इतके एम डी आर रुग्ण व 33 एक्स डी आर रुग्ण आढळले आहेत.
दोन आठवडयांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडणे अशा रुग्णांनी या मोहीमेअंतर्गत मोफत तपासणी करुन घ्यावी. तसेच यापुर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेल्या रुग्णांनी सुध्दा आपला बेडका नमुना तपासणी करीता आरोग्य कर्मचा-यांकडे दयावा, व मोहीम कालावधीमध्ये घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचा–यांना योग्य ती माहिती द्यावी व या मोहिमेचा निरोगी अरोग्यासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी.कुंभार यांनी केले.
Leave a Reply