मधुमेह रुग्णांनी उपवासाच्या काळात जास्त काळजी घ्यावी: डॉ.राजेश देशमाने

 

कोल्हापूर: मधुमेहींना जर उपवास करायचा असेल, तर मधुमेहासंदर्भातील व्यवहार्य सल्ले आणि उपवासासंदर्भातील धार्मिक सल्ले महत्त्वपूर्ण ठरतात. यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य आरोग्यसमस्या म्हणजे हायपोग्लासेमिया, हायपरग्लासेमिया, डिहायड्रेशन आणि चयापचयात डायबेटिक केटोअॅसिडोसिससारखी गंभीर स्वरूपाची गुंतागुंत निर्माण होणे. उपवासादरम्यान शरीरातील व्यवस्थांवर खूप ताण येतो आणि सलग किती काळ उपवास केला जातो यावर हा ताण अवलंबून असतो. आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा शरीर ग्लुकोजचा साठवलेला स्रोत वापरते आणि नंतर ऊर्जेचा स्रोत निर्माण करण्यासाठी शरीरातील चरबीचे विभाजन सुरू होते. उपवासादरम्यान शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण, रक्तातील ग्लुकोजची पातळी उपवासामुळे खूप खालावण्याची शक्यता असते. तुम्ही उपवास करणार असाल तर तुमच्या डॉक्टरांना याची माहिती देणे उत्तम असते.असे तज्ञ डॉ.डॉ.राजेश देशमाने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उपवासाचा कालावधी १२ तासांहून अधिक असेल,तर ग्लुकोजची पातळी कधी वर तर कधी खाली जाण्याचा प्रकारही घडू शकतो. सहसा दिवसातील पहिले जेवण पहाटे घेणाऱ्या मधुमेहींमध्ये दुपारी उशिरापर्यंत ग्लायकोजेनची पातळी घसरलेली असते आणि केटोजेनेसिस याच वेळी होतो. जर जेवण घेतले नाही, तर त्यातून पुढे उपवासाच्या दिवसाच्या सुरुवातीलाच ग्लायकोजेनचा साठा कमी होतो आणि केटोसिस होतो.
काही मधुमेह झालेले रुग्ण सहसा स्थूल असतात आणि त्यांची पोटे मोठी असतात. रुग्णाचे वजन अधिक वाढल्यास, परिस्थिती अधिक बिकट होते. अधिक इन्शुलिन घेण्याची गरज भासते.म्हणजेच अधिक वजन वाढणे. हे दुष्टचक्र सुरू होते. सौम्य स्वरूपाचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन केलेला विखंडित उपवास मधुमेहाच्या रुग्णांना वजन कमी करण्यासाठी तसेच रक्तातील ग्लुकोजची पातळी, रक्तदाब व कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, उपवास डॉक्टरांच्या सल्ल्यावाचून करू नये. रुग्णाने उपवास करण्याच्या ६-८ आठवडे आधी डॉक्टरांकडे जाऊन उपवासामुळे त्याच्या किंवा तिच्या शरीराला किती धोका आहे हे तपासून घ्यावे. उपवास सोडताना खाण्याचे आरोग्यकारक पर्याय निवडणे, घरी ग्लुकोमीटर वापरून नियमित साखरेची पातळी तपासत राहणे, रक्तातील साखर वाढल्याची तसेच कमी झाल्याची लक्षणे ओळखण्यास शिकणे हे सर्व उपवासादरम्यान निर्णायक असते.
७ मे पासून रोजे सुरु होत आहेत.रमजानमध्ये रोजे करू इच्छिणाऱ्या सर्व मधुमेहींनी रमजानचा महिना सुरू होण्याच्या १-२ महिने आधीच त्यांचा मधुमेह किती नियंत्रणात आहे याची तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे मधुमेहामुळे होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या जटील विकारांची आणि जोडीने येणाऱ्या आजारांची तपासणी करून घ्यावी. रुग्णांच्या एकंदर स्वास्थ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ग्लायसेमिया, रक्तदाब आणि लिपिड्सच्या नियंत्रणाकडे लक्ष दिले पाहिजे. उपवास हा एक प्रशंसनीय धार्मिक आचार असला तरी मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी तो धोकादायक ठरू शकतो. आहारतज्ज्ञ आणि आरोग्यसेवक श्रद्धाळू मधुमेहींना तसेच धार्मिक गटांना उपवासाचा धोका समजावून देऊ शकतात. रमजान आणि मधुमेहाबाबत एकंदर जागरूकता वाढल्यास वैद्यकीय व धार्मिक मार्गदर्शनातील सौहार्द बळकट होईल. उपवास व मधुमेह, व्यक्तीगत धोक्याचे मापन आणि सुरक्षित उपवास साध्य करण्यासाठीचे पर्याय यांचा समावेश असलेला रचनात्मक रुग्ण शिक्षण कार्यक्रम राबवण्याचे प्रशिक्षण आरोग्यक्षेत्रातील व्यावसायिकांना दिले पाहिजे. या शैक्षणिक कार्यक्रमात उपवासाचा कालावधी व त्यादरम्यानचे शारीरिक श्रम यांबद्दलही मार्गदर्शन केले जावे.असेही डॉ. देशमाने यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!