
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत असल्याचा आनंद मोठा आहे, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यापीठाची सन २०१६ची दैनंदिनी आणि दिनदर्शिका यांचे आज कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते व्यवस्थापन परिषद सभागृहात प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, केवळ पंधरा दिवसांपूर्वी विद्यापीठाची दिनदर्शिका असावी, अशी अपेक्षा मी व्यक्त केली. त्याला प्रतिसाद म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना विभाग व जनसंपर्क कक्षामार्फत अगदी अत्यल्प काळात या दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली. उपलब्ध कालावधीत जास्तीत जास्त चांगली निर्मितीमूल्ये जपण्याचा यात प्रयत्न झाला आहे. तथापि, पुढील काळात सुधारणांसाठी सूचनांचेही स्वागतच असेल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांच्या हस्ते दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, या दैनंदिनीच्या निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असणारे छायाचित्रकार शिरीष गवळी, जनसंपर्क कक्षाचे सेवक राघवेंद्र येसणे व आर्टिस्ट विशाल पाटील यांचा कुलगुरूंच्या हस्ते दिनदर्शिका प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply