
कोल्हापूर : जनसंपर्काचे क्षेत्र झपाट्याने बदलत असून त्याची गरज कधी नव्हे इतकी वाढली आहे. बदलत्या काळानुरुप या क्षेत्राने तंत्रज्ञानात्मक बदल स्वीकारले आहेतच. पण नजीकच्या काळातही अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील व्यावसायिकांनी तयार राहावे, असे आवाहन पुण्याच्या सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनचे प्रमुख प्रा.अनन्य मेहता यांनी केले.
पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने कोल्हापूर विभागातील जनसंपर्क क्षेत्रातील व्यावसायिकांची पहिली परिषद झाली. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात ‘जनसंपर्क क्षेत्रातील बदलते प्रवाह’ या विषयावर बीजभाषण करताना प्रा. मेहता बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.बी.एम. हिर्डेकर होते,तर उद्घाटन म्हणून पीआरसीआय- यंग कम्युनिकेटर्स क्लबचे राष्ट्रीय सचिव अविनाश गवई उपस्थित होते.
प्रा. मेहता म्हणाले, गेल्या काही वर्षांत जनसंपर्क क्षेत्रात लक्षणीय बदल झाले आहेत. या बदलांशी जुळवून घेण्याचाही या क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आहे. पारंपरिक जनसंपर्क साधने ते कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान असा हा प्रवास आहे.या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हे बदल स्वीकारण्याखेरीज गत्यंतर नाही.तथापि, कन्टेन्टचे महत्त्व मात्र अबाधित राहणार आहे. त्यामुळे उत्तम पद्धतीचा आशयगर्भ आणि अर्थपूर्ण कन्टेन्टची निर्मिती करणाऱ्या जनसंपर्क व्यावसायिकाचे महत्त्व कायम राहणार आहे. कुलसचिव डॉ.बी.एम.हिर्डेकर म्हणाले, जनसंपर्काच्या क्षेत्राकडून आता सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. त्यामुळे जनसंपर्क व्यावसायिकांना आता बहुआयामी आणि समाजाभिमुख भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ माहितीने परिपूर्ण असणाऱ्या समंजस जनसंपर्काची आज मोठ्या प्रमाणात गरज आहे. जनसंपर्क अधिकारी हा त्यामुळे आता विश्वासार्ह माहितीचा स्रोत किंवा वितरक आहे. सौहार्दपूर्ण सुसंवादाच्या प्रस्थापनेमध्ये अशा जनसंपर्काची भूमिका अत्यंत मोलाची आहे.
यावेळी अविनाश गवई यांनी पीआरसीआय आणि यंग कम्युनिकेटर्स क्लबच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पीआरसीआयच्या कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहसचिव रविराज गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष सतीश ठोंबरे यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्रात ‘जनसंपर्क क्षेत्रातील बदलते प्रवाह’ या विषयावर परिसंवाद झाला. या परिषदेला जनसंपर्क व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कोल्हापूर येथे रविवारी पब्लिक रिलेशन्स् कौन्सिल ऑफ इंडीया यांच्या वतीने पी.आर.सी.आय कोल्हापूर विभागातील जनसंपर्क अधिकाऱ्यांची पहिली कॉन्फरन्स परिषद पार पडली. यावेळी परिषदेत वारणा दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी पी.व्ही. कुलकर्णी ,कोल्हापूर पीआरसीआयचे अध्यक्ष डॉ.आलोक जत्राटकर,सचिव रावसाहेब पुजारी, राजेश शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply