हिंदु संघटनांच्या एकजूटी साठी २७ मे पासून गोव्यात अष्टम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन

 

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. त्यामुळे केंद्रामध्ये येणारे सरकार हिंदुहिताचा विचार करेल कि ढोंगी सेक्युलरवादाचे समर्थन करेल, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. मूलत: इंदिरा गांधी यांनी १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षांना तुरुंगात डांबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ संविधानात असंवैधानिक पद्धतीने पालट करून त्यात ‘सेक्युलर’ शब्द घातला. त्यानंतर भारतात ‘सेक्युलर’वादाचा उपयोग केवळ अल्पसंख्यांकांचे लाड पुरवण्यासाठी आणि स्वतःची मतपेटी सुरक्षित करण्यासाठी झाला आहे. संविधानात सर्व नागरिकांना समान अधिकार देण्याविषयी स्पष्ट भूमिका असतांनाही देशात समान नागरी कायदा लागू केला जात नाही, मशीद-चर्च यांच्यासाठी स्वतंत्र कायदे करणारे सेक्युलर सरकार हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण करून त्यांच्या मर्जीप्रमाणे हिंदूंच्या निधीचा वापर करत आहे. हे सर्व एकीकडे घडत असतांना दुसरीकडे ख्रिस्तीबहुल मिझोराम राज्यात राज्य सरकारने ख्रिस्ती पद्धतीने पदग्रहण सोहळा केला, तसेच ‘आमचे ख्रिस्ती राज्य असल्याने आम्हाला हिंदू राज्यपाल नको’, अशी मागणी केली. त्यामुळेच देशातील हिंदूंनाही सन्मान आणि अधिकार मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्राचा संकल्प हिंदु संघटनांनी केला आहे.
या दृष्टीनेच हिंदु समाजाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देऊन संघटितपणे हिंदु राष्ट्र साकार करण्यासाठी कृतीची पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोव्यात यावर्षीही २७ मे ते ८ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी सौ. राजश्री तिवारी म्हणाल्या, ‘‘गेल्या सात वर्षांतील ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशनां’मुळे देशभरात ‘हिंदु राष्ट्र’ या संकल्पनेविषयी मोठी जागृती झाली आहे. या अधिवेशनातील सर्व कार्यक्रमांना मिळून भारतातील २६ राज्ये, तसेच बांगलादेश येथून एकूण २०० हून अधिक हिंदु संघटनांचे ८०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.
केंद्रात नवीन सरकारच्या स्थापनेनंतर काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, समान नागरी कायदा, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्याबंदी, धर्मांतर बंदी, अयोध्येत श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण आदी हिंदूंच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर विचारमंथन करून सरकारला ठोस भूमिका घेण्यास भाग पाडण्याच्या दृष्टीने संघटनात्मक प्रयत्नांची निश्‍चिती या अधिवेशनाच्या द्वारे केली जाणार आहे. त्यासह पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील हिंदूंचे रक्षण करण्याच्या संदर्भातही चर्चा केली जाणार आहे.’’
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांतर्गत धर्मप्रेमी अधिवक्त्यांचे २७ आणि २८ मे या दिवशी ‘हिंदु अधिवक्ता अधिवेशन’ होणार आहे. या समवेतच २८ मे ला एक दिवसीय ‘उद्योगपती अधिवेशना’चे ही आयोजन करण्यात आले आहे.’
या वेळी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे म्हणाले, ‘‘२९ मे ते ४ जून या कालावधीत हिंदुत्वनिष्ठांचे ७-दिवसीय ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ होईल. याअंतर्गत सोशल मीडिया’चे महत्त्व लक्षात घेता ‘सोशल मीडिया’च्या क्षेत्रातील धर्मनिष्ठ हिंदु कार्यकर्ते आणि विचारवंत यांच्यासाठी पहिल्या एक दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजनही केले आहे. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते ८
जून या कालावधीत हे अधिवेशन असेल.मागील सात राष्ट्रीय अधिवेशनांत निश्‍चित झाल्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य-मांस यांच्या विक्रीवर बंदी घाला आणि मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करावे, सरकारने तात्काळ कायदा करून राममंदिर उभारावे, युवापिढीला चंगळवादी बनवणारा संस्कृतीभंजक ‘सनबर्न’ फेस्टिव्हल रहित करा, २५ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९ या काळात सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध झुगारून फटाके वाजवणार्‍यांवर कठोर कारवाई करा, ‘शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा आणि धर्मपरंपरा रक्षणार्थ आंदोलन करणार्‍या ३ सहस्र ५०० भक्त आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, शनिशिंगणापूरसह राज्यातील सर्व मंदिरांच्या परंपरा रक्षणासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा यांसह विविध विषयांवर आंदोलने करण्यात आली. १२ मे या दिवशी स्थानिक संघटनांचे संघटन करण्यासाठी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या आठव्या अधिवेशनाद्वारे होईल. या अधिवेशनाला कोल्हापूर येथून हिंदुत्वनिष्ठ उद्योजक, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता, शिवसेना, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांसह २० हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.यावेळी राजू यादव, सुरेश यादव,डॉ. मानसिंह शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!