
कोल्हापूर: हिमालयाच्या लेह-लडाख प्रदेशातील वीस हजार फुटांवर असणाऱ्या ‘स्टोक कांगरी’ या पर्वतावरील व महाराष्ट्रातील भीमाशंकर, पदरगड, कोथळीगड, पन्हाळा आणि रायगड या गडांवरील पाणी कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनच्यावतीने 5 जूनला रायगडावर आणण्यात येणार आहेत. 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनी या सोहळ्यात त्या पाण्याने जलाभिषेक करण्यात येईल. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हा मान हायकर्स फाउंडेशन ला 2013 पासून दिलेला आहे. अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन रायगडावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोल्हापूर हायकर्सनेही या सोहळ्यात सहभाग नोंदवला आहे. ट्रेकच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून पाणी आणून शिवराज्याभिषेक सोहळावेळी जलाभिषेक केला जातो. यंदा ही मोहीम 31 मे रोजी सुरू होणार असून विविध गडांवरून पाणी आणून पाच जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ठिकाणी जाणार असल्याचेही सागर पाटील यांनी सांगितले. या मोहिमेमध्ये प्रणव बारटक्के, तेनाज कुमठेकर, तन्मय हावळ, शशांक तळप, रवी धुमाळ, विजय ससे, अतुल पाटील संतोष घोरपडे यांच्यासह गिर्यारोहक सहभागी होणार आहेत. त्याच प्रमाणे कोल्हापूर हायकर्सच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या दहा मिनिटांचा लघुपटही रायगडावर दाखवण्यात येणार आहे. एकूण 80 किलोमीटरचा प्रवास गिर्यारोहक पूर्ण करणार असून महाराष्ट्रातील तरुणांना एक आदर्श घालून देण्याचे काम कोल्हापूर हायकर्सवतीने केले जात आहे.
Leave a Reply