
कोल्हापूर: उन्हाळी सुट्टी लागली की लहान मुले विविध उन्हाळी शिबिराला जातात किंवा नातेवाईकांकडे, पाहुण्यांकडे जातात. परंतु जवाहर नगर मध्ये मुलांनी आपल्या सुट्टीचा उपयोग रोपवाटिका तयार करण्यासाठी केला आहे. ‘ग्रीन अर्थ’ नावाची लहान मुलांची पहिली रोपवाटिका जवाहर नगरमध्ये साकारलेली आहे. गेल्या दीड महिन्यापासून परिसरातील लहान मुले रोज आपले दोन तास देऊन या रोपवाटिकेचे संगोपन करत आहेत. विविध प्रकारची झाडे अथवा रोपे लावून त्यांची निगा आणि देखभाल करत आहेत. आम्रपाली रोहिदास यांच्या कल्पनेतून ही रोपवाटिका साकारलेली आहे. आताच्या पिढीसमोर जागतिक तापमान वाढ व पाण्याची कमतरता आहे हे भयान संकट उभे राहिले आहे. परंतु लहान मुलांनी याच्यावर मार्ग काढत ‘झाडे लावा झाडे जगवा’ आणि पर्यावरण हे मानवी आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले आहे. रोपवाटिकेमध्ये आजवर या लहान मुलांनी पाचशेहून अधिक रोपे लावली आहेत. यामध्ये अथर्व दीक्षित, तनवी बस्ती, जानवी गोंजारे, प्रथमेश दीक्षित, राजलक्ष्मी रोहिदास, तृप्ती कदम, नंदिनी हेगडे, हर्षदा कदम, वैष्णवी दिक्षित प्रमोद भास्कर यासह परिसरातील सर्व बालचमूंचा सहभाग आहे. तरी लहान मुलांच्या या कार्याला हातभार लावण्यासाठी जवाहर हायस्कूलजवळ, शाहू सेना चौक, जवाहर नगर येथे रोपे अथवा मातीच्या स्वरूपात या रोपवाटिकेला मदत करावी असे आवाहन आम्रपाली रोहिदास यांनी केले आहे.
खूप छान