गडकोटांसाठी स्वतंत्र खाते निर्माण व्हावे: संभाजीराजे छत्रपती

 
रायगड  : गडकोटांसाठी स्वतंत्र खाते निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत गडकोटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याकरिता जपानशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे सांगितले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्यावर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. राजसदरेवर शेतकरी कुटुंबाला बसण्याचा मान यंदा मिळाला. सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’संकल्पनेखाली काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत अठरापगड जाती धर्मातील लोक सहभागी झाले होते. पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळयाचे आयोजन केले होते.
संभाजीराजे म्हणाले, “महाराष्ट्राची स्थिती शेतकऱ्यांसाठी चांगली नाही. दुष्काळावर आजतागायत मात करता आलेली नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. नेते करतात तरी काय, असा मला प्रश्न पडतो. शिवराय हे शेतकऱ्यांचे राजे होते. त्यांच्यावर अन्याय कधीच होऊ नये, अशी माझी भावना आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तो आत्महत्या करत असेल तर भारत कृषीप्रधान देश कसा म्हणायचा?”
ते म्हणाले, “गडाचा विकास करत असताना अनेक जण त्यातून मला काय फायदा होणार नाही, असे सांगतात. ते भुरटे, कुचके, फुटके आहेत. महिन्यातील दहा दिवस मी रायगडवर असतो. इथला एकेक दगड म्हणजे इतिहास आहे. मात्र, या लोकांची टिमटिम बंद झाली पाहिजे.”
रायगडचा विकास करताना अडचणी येत आहेत. तरीही त्याच्यावर मात करत कामे सुरू आहेत, असे सांगत असताना संभाजीराजे भावनिक झाले.  भाषण मध्येच थांबवून ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जाऊन नतमस्तक झाले. त्यानंतर 
ते म्हणाले, “रायगडचा विकास होत आहे. महाड ते रायगडमधून राष्ट्रीय महामार्ग जाणार असून. त्याचे काम कंत्राटदार करण्यास तयार नाही. शिवभक्त त्याला चोख प्रत्युत्तर देतील.” 
त्यानंतर दरबारातून पालखी होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर मार्गे रवाना झाली. पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. पारंपरिक वेशभूषेत महिला, शिवभक्त, मुली सोहळ्यात सहभागी‌ झाल्या होत्या. लेझीमच्या प्रात्यक्षिकांत पालखी जगदीश्वर मंदिराकडे रवाना झाली. शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी मिरवणुकीची सांगता झाली. 
दरम्यान तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या शेडमधून शिवछत्रपतींची पालखी ढोल ताशाच्या ठेक्यात शिरकाई देवीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. हलगी घुमकं कैताळाच्या कडकडाटात पालखी राजसदरेवर रवाना झाली. पाठोपाठ खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरेवर आले. पोलिस बॅन्डने त्यांचे स्वागत केले. शाहीर राजेंद्र कांबळे यांनी ‘रयतेचा हा राजा झाला संभाजीराजा’ हे स्वागतगीत गायिले. पोलंडच्या तिसऱ्या सचिव इव्हा स्टॅनकिव्हिसिक, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, प्रांत विठ्ठल इनामदार, जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!