
कोल्हापूर : गरोदरपणात दुसऱ्या तिमाहीत बाळामधील हृदयाची व इतर अवयवांची जन्मजात व्यंगे ओळखण्यासाठी ‘सोनोग्राफी’ हेच तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे गर्भाशयातील पुढील धोके समजण्यासाठी सोनोग्राफी करणे हाच एकमेव उत्तम उपाय आहे. तरी महिलांनी गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन चेन्नईचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व संशोधक डॉ.एस सुरेश यांनी केले. कोल्हापूर स्त्री आरोग्य व प्रसुतीतज्ञ संघटनेच्या वतीने आयोजित ‘सोनोकेअर- सोनोग्राफीसाठी उपयुक्त’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गरोदरपणाच्या पहिल्या तिमाही काळामधील शारीरिक आणि गुणसूत्रांमधील दोष कसे ओळखावेत, बाळासाठी कोणते धोके उद्भवू शकतात. गर्भाशयात बाळाची वाढ नीटशी होत नसेल, आतील वातावरण बाळासाठी पोषक नाही हे सोनोग्राफीमध्ये स्पष्ट दिसते. यामुळे परिस्थिती घातक होण्याआधीच बाळाला बाह्यजगात आणण्याची निश्चित वेळ सांगता येते. जुळ्या बाळांचे या जगात येणे आरोग्यदायी आणि सुकर व सोपे व्हावे यासाठी सोनोग्राफी हे उपयुक्त साधन बनू शकते. थ्रीडी तंत्रज्ञानाने सोनोग्राफीला एक पाऊल पुढे नेऊन ठेवले आहे. तसेच पेल्विक सोनोग्राफीने वंधत्व निवारण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.अशा विविध चर्चासत्रात डॉ.मणिकंडन, डॉ. इंद्राणी सुरेश,डॉ.अजित पाटील,डॉ. नित्यकल्याणी यांनी तज्ञांना मार्गदर्शन केले. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मंजुळा पिशवीकर यांनी संपूर्ण भारतात गरोदरपणातील सोनोग्राफीवर संशोधने होत आहेत. यामुळे प्रसूतीमध्ये बाळ आणि बाळंतीण दगावण्याच्या प्रमाणात खूपच घट झाली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांना व्हावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असा कार्यशाळा आयोजनाचा उद्देश विशद केला.
यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षा डॉ.निरुपमा सखदेव,सचिव डॉ.अनघा कुलकर्णी,डॉ. प्रवीणकुमार लोहार,डॉ.माया पत्की, डॉ.रूपा नागावकर, डॉ. सुरेखा आडनाईक,डॉ. संगीता देसाई यांच्यासह चारशेहून अधिक तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.
Leave a Reply