
कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय आणि महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली असून, डोनेशन, बांधकाम फी, शालेय साहित्य या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांची लुट शिक्षण सम्राटांच्या कडून होत आहे. यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कोणतेही नियंत्रण नसून, शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. दरवेळी शिवसेनेने आंदोलन केले कि शिक्षण उपसंचालक कार्यालयास जाग येते. गेल्या दोन वर्षात पालकांची लुट करणाऱ्या शाळा बंद करा, अशी मागणी युवासेनेने केली आहे. यावर कोणती कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल येत्या दोन दिवसात द्या, अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा देत आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शिक्षण संस्थाच्या चाललेल्या मनमानी कारभारा विरोधात शिवसेना व युवासेनेच्या वतीने आज शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, शिक्षण सम्राटांचा व शिक्षण खात्याच्या भ्रष्टाचारी कारभार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्च्याच्या अग्रभागी शिक्षण सम्राटांचा राक्षस पालक व विध्यार्थाच्या गळ्यावर सुरी ठेऊन लुट करीत असल्याचा देखावा सादर करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनेच्या वतीने गेले १२ वर्षे या कार्यालयास निवेदन देऊन प्रवेश प्रक्रिया सुरळीत पडण्या विषयी मागणी केली जाते. परंतु दिलेल्या निवेदनातील प्रश्न मिटलेले नाहीच तर त्यात पुन्हा वाढ होत आहे. शाळा, महाविद्यालयान मध्ये प्रवेशासाठी लाखो रुपयांचे डोनेशन आकारले जात आहे. याकडे शिक्षण खात्याचे लक्ष नाही. पालक शिवसेने कडे तक्रार करतात पण शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार करत नाहीत याचा अर्थ पालकांचा शिक्षण खात्यावर विश्वास नाही किवा त्यांना योग्य सहकार्य केले जात नाही आहे. शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची मिलीभगत असून, अधिकारी पाठीशी घालत असल्यानेच पालकांची लुट करण्याचे शिक्षण संस्थांचे धाडस वाढले आहे. काही शाळांमध्ये इमारत बांधकाम निधी नावाखाली भरमसाठ फी भरण्याची सक्ती केली जाते, हि रक्कम घेण्यासाठी शिक्षण कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली आहे काय? पालकांना ठराविक दुकानामधून शालेय साहित्य व गणवेश खरेदी करण्यासाठी सक्ती केली जाते, यामध्ये शाळेचे कमिशन असते. काही ठराविक शाळा तर उघडपणे डोनेशन घेत आहेत. यावर कोणती कारवाई कार्यालयाने केली, असा जाब आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारला.
यावर शिक्षण विभागाचे अधिकारी निरुत्तर राहिले.यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी, गेली १२ वर्षे आम्ही शिक्षण पद्धतीवर निवेदन देवून सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे पण प्रशासन याकडे कानाडोळा करून शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभारास सवलत देत आहे. आंदोलनकर्त्यांना कारवाई केल्याचे दाखवायचे प्रत्यक्षात जुजबी कारवाई करून शिक्षणसम्राटाना अभय देण्याचे काम अधिकारी करीत आहेत. त्याचमुळे पालक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात शिक्षण संस्थांना मुभा मिळत आहे. मनमानी कारभार करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कोणाचे नियंत्रण आहे? पालकांची लुट करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई का होत नाही? कारवाई होत नाही म्हणूनच शिक्षण संस्थांचा मनमानी कारभार सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना कारागृहात डांबले गेले. अशा खोट्या गुन्ह्यांना आम्ही कधीच भिक घालणार नाही. त्यामुळे ये रे माझ्या मागल्या प्रमाने कारभार करायचा हि शिक्षण उपसंचालक कार्यालयाची कार्यपद्धती बदला, अन्यथा पालक आणि विध्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना गनिमी कावा करेल, अधिकार्यांना सळो कि पळो करू, असा इशारा देत प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी, विध्यार्थी संघटना, शिक्षण विभागाशी निगडीत सर्व विभाग व अधिकारी आणि सर्वच शिक्षण संस्थांचे प्रमुख यांची संयुक्तिक बैठक आयोजित करावी, अशा सुचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
यावर सहाय्यक संचालक सुभाष चौगुले यांनी, तक्रार असलेल्या शाळांना नोटीस काढू, तसेच गेल्या दोन वर्षातील कारवाईचा अहवाल तातडीने दोन दिवसात पोहच करण्याची ग्वाही दिली. यासह लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग, शिक्षण संस्था प्रशासन आणि पालकांची समन्वयक बैठक घेऊन या बैठकीत पालकांच्या शंकाचे निरसन करू, अशी ग्वाही दिली.
दरम्यान सदर करण्यात आलेल्या देखाव्यामध्ये शिक्षण सम्राट म्हणून रणजीत जाधव, भूमिका पार पाडली. यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने सहाय्यक संचालक सुभाष चौगुले, मनपा प्रशासन अशिकारी एस.के. यादव, निरंतर शिक्षण अधिकारी कासार यांनी निवेदन स्विकारले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, दीपक गौड, युवा सेना जिल्हा समन्वयक योगेश चौगुले, जिल्हा चिटणीस अविनाश कामते, युवा सेना युवा शहर अधिकारी चेतन शिंदे, विश्वजितसाळोखे, विधानसभा समन्वयक शैलेश साळोखे, गुरु लाड, आय टी सेल अधिकारी सौरभ कुलकर्णी, शिवसेनेचे जयवंत हारुगले, किशोर घाटगे, धनाजी दळवी, सुनील जाधव, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, विशाल देवकुळे, राजू काझी, प्रकाश सरनाईक, राजू भोरी, दिनेश साळोखे, कपिल पोवार, कृष्णा लोंढे, विनय क्षीरसागर, शिवतेज सावंत, अनिल माने, यांच्या सह शिवसैनिक व युवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
Leave a Reply