छत्रपती संभाजी महाराज स्मारक  १० लाख तर स्वर्गरथास१५ लाखांचा निधी

 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्याचे कोल्हापूर महानगपालीकेने योजिले आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजाचा इतिहास दाखविला जाणार आहे. त्यांनी केलेल्या लढाया, ऐतिहासिक बाज दर्शवण्यासाठी दगडी भिंत, विद्युतरोषणाई, कारंजे आदींचा यात समावेश असेल, छत्रपती संभाजी महाराजांचे म्युरल तयार करण्यासाठी सुमारे रु.१९ लाख इतका खर्च आहे. तर स्मारक सुशोभीकरणासाठी रु.२६ लाख खर्च येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे कोल्हापूरची अस्मिता असून या करिता निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी गत बैठकीत दिली होती. त्यानुसार आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी छत्रपती संभाजी महाराजा यांच्या स्मारकासाठी आमदार फंडातून रु.१० लाखांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेस दिला.

यासह कोल्हापूर शहरातील उपलब्ध शववाहीकांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रात्री-अपरात्री शववाहिका उपलब्ध नसल्यास शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. मराठवाडा- विदर्भ भागात मृतांच्या शवाच्या अंत्ययात्रेकरिता स्वर्गरथाचा वापर करण्यात येतो. त्याच पद्धतीचे स्वर्गरथाची सुविधा कोल्हापूरवासियांना उपलब्ध व्हावी, या हेतूने आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेस स्वर्गरथ खरेदी करण्याकरिता आमदार फंडातून रु. १५ लाखांचा निधी दिला आहे.

 दोन्ही निधीची पत्रे आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापौर सौ. सरिता मोरे, आयुक्त मल्लिकनाथ कलशेट्टी, यांच्या कडे सुपूर्द केली. यासह तातडीने निधी वर्ग करून दोन्ही कामे तातडीने पूर्णत्वास नेण्याची मागणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते विलास वास्कर, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, माजी महापौर सौ. हसीना फरास, नगरसेवक ईश्वर परमार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.

यानंतर बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, सुरतमधील दुर्दैवी घटनेत २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्ठीने अग्निशमन दल सुसज्ज करण्याकरिता अत्याधुनिक टर्नटेबल लॅडर खरेदी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. याकरिता कोल्हापूर महानगरपालिकेस रु.४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पण अद्यापही टर्न टेबल लॅडर खरेदी केला नसल्याने अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने उर्वरित रक्कम स्वनिधीतून तरतूद करून तातडीने अत्याधुनिक टर्नटेबल लॅडर खरेदी करावा, अशी मागणी केली.

याचबरोबर महिलांना बेरोजगार करणारी केंद्रीय किचन पद्धत रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात २००३ पासून शालेय पोषण आहार योजना सुरु आहे. महिला बचत गत व व्यक्तिगत स्वरुपात ठेका दिल्या जाणाऱ्या या योजनेत केंद्रीय किचन पद्धत अंमलात आणली जाणार असल्याने, हजारो महिलांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. स्थानिक पातळीवर या योजनेतील अटी शिथिल करून या योजनेत महिला बचत गटांना सामावून घेणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ते प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर या प्रश्नी लवकरच मा.मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!