
कोल्हापूर: शासकीय तंत्रनिकेतन येथे दि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ फौंड्रीमेन, कोल्हापूर व मे. घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यासोबत सुरू असणाऱ्या कम्युनिटी कॉलेजमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त बी.व्होक फौंड्री टेक्नॉलॉजी व बी.व्हेाक कास्टिंग डेव्हलपमेंट अॅन्ड क्वालिटी अॅश्युरन्स हे दोन अभ्यासक्रम राबविण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ (बाटू) यांची संलग्नता मिळाली. तंत्रनिकेतनामध्ये रोजगाराभिमुख कौशल्यकेंद्रित अभ्यासक्रम चालविण्यात यावेत व उद्योगधंद्यांना तंत्रनिकेतनामधून कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे याकरिता केंद्र व राज्य सरकारचा तंत्रशिक्षण विभाग पुढाकार घेत आहेत. समाजामध्ये तंत्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करूनही रोजगारापासून वंचित राहणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे तंत्रशिक्षणाची लोकप्रियता ओसरू लागल्याचे चित्र आहे. यामागे अभ्यासक्रमाचे स्वरूप व त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये तयार होणारी सक्षमता हा विषय गंभीरपणे चर्चिला जातो. या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्था व उद्योगधंदे यांच्या समन्वयातून एक दशकापासून सुरू असणारे तंत्रनिकेनमधील फौंड्री टेक्नॉलॉजी या विषयातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनविण्यामध्ये खूपच यशस्वी झालेले आहेत. फौंड्री टेक्नॉलॉजीमधील ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविणारी देशतील एकमेव अभियांत्रिकी संस्था ठरली आहे.आजपर्यंत केवळ पदविका अभ्यासक्रम चालविण्यापर्यंत मर्यादित भूमिका असणाऱ्या तंत्रनिकेतनमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू होणे ही बाब लक्षणीय आहे. पदवी अभ्यासक्रम चालविणाऱ्या अभियांत्रिकी संस्थांमध्ये कौशल्यकेंद्रित अभ्यासक्रम चालविणे हे सोयीचे नाही. आय.टी.आय. संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्याकरिता आवश्यक शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. तंत्रनिकेतनमध्ये उपलब्ध असणारे उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग व इतर सर्व पायाभूत सुविधा यांमुळे कौशल्यकेंद्रित उच्च शिक्षण देण्याचे सर्व आवश्यक बाबी असल्याने यांना स्थानिक उद्योगधंद्याच्या विकासाची केंद्रे बनवणे गरजेचे आहे. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 80 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी पदवी अभ्यासकक्रमाकडे जात असल्याने तंत्रनिकेतनची गरज काय? याचे उत्तर यामधून मिळणार आहे. पदविका पूर्ण झाल्यानंतर व्यवसायाभिमुख किंवा प्रत्यक्ष उद्योगधंद्यामध्ये जाऊन अभियांत्रिकीचे काम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बी.व्होक हा पर्याय उपलब्ध झालेला आहे. पदविकेनंतर प्रत्यक्ष उद्योगधंद्यामध्ये ऑन-जॉब प्रशिक्षण घेत, तांत्रिक कौशल्य आत्मसात करीत आर्थिकरीत्या स्वावलंबी होऊन पुढील तीन वर्षांमध्ये जास्त सक्षम होणे यांमुळे शक्य होणार आहे.पदवी अभ्यासक्रमामुळे या क्षेत्रातील सर्व कार्यरत तंत्रज्ञांना खऱ्या अर्थाने करिअरसाठी लागणारी गुणवत्ता पूर्ण अर्थाने उपलब्ध झाली आहे. याचा निश्चितच अनेकांना लाभ होईल, असा विश्वास आय.आय.एफ.चे चेअरमन सुमित चौगुले यांनी व्यक्त केला.कम्युनिटी कॉलेजमधून 2013-14 पासून आजपर्यंत 677 विद्यार्थ्यांनी हे अभ्यासक्रम पूर्ण केले असून करिअरच्या बाबतीत त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असल्याचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले.दरम्यान, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कम्युनिटी कॉलेजची व्याप्ती वाढवण्यामध्ये मुख्य समन्वयक प्रा. शशांक मांडरे यांचे मोलाचे योगदान आहे. मे. घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे चेअरमन किरण पाटील, मेनन अॅन्ड मेननचे संचालक विजय मेनन, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. म्हेत्रे, प्रा. डॉ. कुणाल बोरसे, प्रिया जाधव व आय.आय.एफ.चे पदाधिकारी व उद्योजक संजय पाटील, रवींद्र पाटील, समीर पाटील व सेक्रेटरी अभिजित नाईक उपस्थित होते.
Leave a Reply