कोल्हापूर सराफ व्यापारी संघ निवडणूकीची चुरस वाढली

 

कोल्हापूर : येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघासाठी आज अर्ज छाननीनंतर चुरस वाढली. यामध्ये छाननीनंतर एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याची माहिती निवडणूक अधिकारी कांतिलाल गुलाबचंद यांनी दिली. दरम्यान, येत्या मंगळवारी (ता. १८) माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल.सराफ संघाच्या इमारतीमध्ये आज निवडणूक समितीचे पदाधिकारी बिपीन परमार, उमेश जामसांडेकर, विजय वशीकर, जवाहर गांधी व हेमंत पावसकर यांच्या उपस्थितीमध्ये काल सायंकाळपर्यंत जमा झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदासाठी कुलदीप गायकवाड, विजय हावळ, रवींद्र खेडेकर, विजयकुमार भोसले असे चार, उपाध्यक्षपदासाठी किरण गांधी, राजेश राठोड, जितेंद्र राठोड, नरेंद्र राठोड असे चार, तर संचालक पदासाठी महेंद्र ओसवाल, प्रीतम ओसवाल, प्रसाद कालेकर, ललित गांधी, तेजस धडाम, किशोर परमार, सनी पोतदार, शीतल पोतदार, शिवराज पोवार, अनिल पोतदार, शिवराज पाटील, शिवाजी पाटील, अभिजित बकरे, रवींद्र राठोड, संजय चोडणकर, सुहास जाधव, नंदकुमार काकडे, संजय जैन, धर्मपाल जिरगे व शेखर वशीकर असे २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. १८) मुदत आहे. याचदिवशी सायंकाळी सात वाजता उमेदवारांची अंतिम यादी नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. रविवार, ता. 23 जून रोजी सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत संस्थेमध्ये मतदान होऊन त्याच दिवशी दुपारी तीननंतर मतमोजणी होईल. यावेळी उमेदवार आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुसरीकडे सर्वच उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचार सुरू केला आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रामध्ये प्रत्येक दुकानात जाऊन सराफ व्यावसायिक प्रचार करीत आहेत. प्रचारासाठी स्वतः, मित्रपरिवार आणि इतर संस्थांशी असलेल्या नातेसंबंधाचा वापर करून, जरा आमच्या उमेदवाराकडे लक्ष द्या, अशी विनंती केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!