
कोल्हापूर: आर.एल.तावडे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ गार्गीज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात डॉ. विभावरी तावडे यांच्या स्मरणार्थ अवयवदान विषयावर जनजागृती रॅली तसेच अवयवदान करणार्या कुटुंबीयांचा सत्कार आणि या मोहिमेसाठी कायमस्वरूपी समिती तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब गार्गीजच्या अध्यक्षा सुजाता लोहिया आणि आर. एल. तावडे फाऊंडेशनच्या सचिव शोभा तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आर.एल.तावडे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीज व कोल्हापुरातील इतर बारा रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी संध्याकाळी ४ वाजता दसरा चौक ते कावळा नाका या मार्गावर देहदान व अवयवदान हेच श्रेष्ठदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या फेरीचा मुख्य हेतू अवयव दानाविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे हा आहे. त्याचबरोबर ज्या लोकांच्या नातेवाईकांनी अवयवदान किंवा देहदान केलेले आहे, त्यांचा आर.एल.तावडे फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्या वतीने मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दौलत देसाई व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रक्तदानाची शिबिरे बऱ्याच प्रमाणात होतात. परंतु अवयवदान करून एखाद्याचे आयुष्य वाढवणे, मृत्युनंतर व जिवंतपणे कोणाचे तरी आयुष्य सुखकर करण्याचे, एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे भाग्य लागते. म्हणूनच तावडे फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्यावतीने पाच व्यक्तींची कायमस्वरूपी समिती स्थापन करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला डॉ. नीता नरके, कविता घाडगे, किशोर तावडे,सुजय तावडे आदी उपस्थित होते.
Leave a Reply