
कोल्हापूर
: गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांनी कोल्हापूरला योग्य संधी देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार गेले दोन टर्म शिवसेनेचे आमदार असणाऱ्या आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या आमदार राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या पदास कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असून, हे पद यापूर्वी फक्त मुख्यमंत्री महोदयांनी सांभाळले आहे.

गेले दोन दिवस मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरु होती. यामध्ये राज्यमंत्री पदासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांचे नांव आघाडीवर होते. आमदार राजेश क्षीरसागर यांना राज्यमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे आग्रही होते. परंतु मंत्रीमंडळातील संख्याबळ वाढविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आमदार राजेश क्षीरसागर यांना योग्य संधी देण्याच्या दृष्टीने राज्य नियोजन आयोगाच्या “कार्यकारी अध्यक्ष” पदाची धुरा देण्यात आली आहे. या नियुक्तीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील, उद्योगमंत्री नाम. सुभाष देसाई यांनी विशेष प्रयत्न केले.
आमदार राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर काही काळ राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या राजेश क्षीरसागर यांना सन २००५ च्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पदी नियुक्ती केली. त्यानंतर २००६ साली शिवसेनेच्या शहरप्रमुख पदावर निवड या कालावधीत चळवळीच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरवासीयांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सन २००९ मध्ये शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने पहिल्यांदाच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. यामध्ये विजयश्री मिळवीत राजेश क्षीरसागर विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर पुन्हा २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी सुमारे २२ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवीला. आमदार राजेश क्षीरसागर विधानसभेत शिवसेना पश्चिम महाराष्ट्र प्रतोद म्हणून भूमिका बजावत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांना दिलेल्या संधीचे कोल्हापुरातील तमाम शिवसैनिकांनी स्वागत केले आहे.
Leave a Reply