
१९ जून या शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने मराठी भाषेचा एक हजार वर्षाचा साहित्य संदर्भासह अहवाल तयार केला आहे. व तो केंद्र सरकारला सादर केला आहे मराठी भाषेला हा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारला किमान तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. या आर्थिक तरतुदीमुळे मराठी भाषेचे संगोपन होईल. सदरच्या अहवालास साहित्य अकादमीचे मान्यता मिळाली आहे. या देशात कन्नड, बंगाली, तमिळ या भाषांना हा दर्जा आहे. पण अद्याप मराठीला हा दर्जा नाही. यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या कृती कार्यक्रमांमध्ये स्वतंत्र मराठी भाषेचे मराठी विद्यापीठ स्थापन करणे, दहावीपर्यंत मराठी भाषेची सक्ती करणे, सांस्कृतिक मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांनी मराठी साहित्य, कला, लोककला, तमाशा, शाहिरी, भजन, कीर्तन यांचे संगोपन व जोपासना करणे यासाठी चोवीस जून रोजी सकाळी सामुदायिक शपथ कार्यक्रम, २७ जून रोजी मराठी भाषेचे फलक लावण्यासाठी सविनय फेरी आणि एक जुलै रोजी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष शिवाजी जाधव उपस्थित होते.
Leave a Reply