कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच २८ ते ३० जून दरम्यान तीन दिवसीय ‘मंडपम ‘ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन यांच्या वतीने हे प्रदर्शन प्रथमच कोल्हापुरात आयोजित केले असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष सागर चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूर जिल्हा मंडप लाईटींग डेकोरेशन असोसिएशनच्यावतीने आणि वेल्फेअर ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रामकृष्ण लॉन येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून या प्रदर्शनात शंभरहून अधिक स्टॉल्स असणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हजारो मंडप डेकोरेटर्स व्यवसायिकांना विशिष्ट चाकोरीमधून बाहेर पडून आपला व्यवसाय वाढवण्यासाठी या प्रदर्शनाचा नक्कीच लाभ होईल अशी अपेक्षा सागर चव्हाण यांनी व्यक्त केली. प्रदर्शनामध्ये सुपरस्ट्रक्चर मंडप आणि डेकोरेशन साहित्य, फायबर साहित्य, फुलांचे तयार डेकोरेशन, कापड, खुर्ची, कर्टन्स, टेबल कव्हर्स, गालिचे, कार्पेट, लाईट, डेकोरेशन, चवरी मंडप अशा अनेक आकर्षक व डेकोरेशन व्यवसायाशी संबंधित देशभरातील साहित्य उत्पादक विक्रेते सहभागी होणार आहेत. मंडप डेकोरेशनसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी पाहण्याची तसेच खरेदी करण्याची सुवर्ण संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत खुले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन २८ जून रोजी सकाळी ११ वाजता श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील असणार आहेत.
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहील. याच ठिकाणी चार वाजता व्यावसायिकांसाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष दगडू पुरोहित मार्गदर्शन करणार आहेत. तसेच २९ जून रोजी सायंकाळी चार वाजता जीएसटीविषयी चर्चासत्र होणार आहे. कोल्हापूर बरोबरच सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून तीन हजार मंडप व्यवसायिक यामध्ये सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्हा मंडप लाईटींग असोसिएशनच्यावतीने कोणताही मोबदला न घेता प्रदर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या मंडपाची उभारणी सुरू केली आहे. व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकीचे भान जपत आज पर्यंत असोसिएशनने मराठा मोर्चा, दुष्काळ व पुरामुळे होणारे नुकसान यात पुढाकार घेतला आहे. आणि त्यांना मदत केली आहे. असेही चव्हाण यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला तुकाराम पाटील, मुसा शेख, विजय सूर्यवंशी, अनिल काटे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Leave a Reply