
कोल्हापूर:कोल्हापूर सर्जिकल सोसायटी (केएसएस) व असोसिएशन ऑफ ब्रेस्ट सर्जन्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २९ जून रोजी ‘स्तनाचे सर्व आजार व त्यावरील अत्याधुनिक उपचार’ या संदर्भात केएसएस अॅब्सी- काॅन २०१९ या एकदिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सोसायटीला दोन गुण प्रदान केले आहेत.कामातील अनियमितता, व्याप, धावपळ यामुळे स्वतः च्या आरोग्याविषयी महिला जागरूक रहात नाहीत. याचा विपरित परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच याबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी या परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सर्जिकल सोसायटीचे मानद सचिव डॉ. कौस्तुभ कुलकर्णी आणि सर्जन ऑफ इंडिया गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. प्रतापसिंह वरुटे यांनी वैद्यकीय परिषदेबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शनिवारी सकाळी ११ वाजता डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. अखिल भारतीय शल्यचिकित्सक संस्थेचे अध्यक्ष डॉ. रघुराम, बेंगलोरचे डॉ. अशोक बी.सी, मुंबईचे डॉ. अभय दळवी, डॉ. बानी परमार, डॉ. शलाका जोशी, डॉ. श्रीकांत सोलव, डॉ. रश्मी गुडूर, डॉ. आनंद गुडूर, डॉ. शरद देसाई, डॉ. अंजली डावले, डॉ.दुष्यंत जसवाल या तज्ञ चिकित्सकांकडून मार्गदर्शन होणार आहे.
तसेच सायंकाळी पाच ते सात या वेळेत डॉ.रघुराम हे ‘स्तनाचे आजार व अत्याधुनिक उपचार’ या विषयावर खुल्या चर्चासत्रात शाहू स्मारक भवन येथे मार्गदर्शन करणार आहेत.
वैद्यकीय परिषदेस सातारा, सांगली, बेळगाव, रत्नागिरी, सोलापूर तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून दीडशेहून अधिक शल्यचिकित्सक उपस्थित राहणार आहेत.तरी चर्चासत्राचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्जिकल सोसायटी च्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण कुकरेजा, उपाध्यक्ष डॉ. विजय कसा, डॉ. बसवराज कडलगे, कोषाध्यक्ष डॉ. मानसिंग नाईक, सल्लागार डॉ. सोपान चौगुले, महाराष्ट्र स्टेट चाप्टरचे कोषाध्यक्ष डॉ.आनंद कामत, कार्यकारी सदस्य डॉ. रवींद्र खोत आदी उपस्थित होते.
Leave a Reply